

पुणे: राज्यातील संपलेला ऊस गाळप हंगाम 2024-25 मधील शेतकर्यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची सुमारे 57 कोटी 32 लाख रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिध्दाराम सालीमठ यांनी संबंधित आठ कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
त्यामध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यांचाही समावेश आहे. तसेच सोलापूरमधील तीन, अहिल्यानगर, जालना, यवतमाळ आणि बुलढाण्यातील प्रत्येकी एका साखर कारखान्याचा जप्तीच्या कारवाई समावेश आहे. (Latest Pune News)
साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी रक्कमेवर 15 टक्के दराने देय होणारे व्याज या रक्कमा कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादीत केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन त्यामधून ही रक्कम वसूल करण्यात यावी.
साखर साठा बँकेकडे तारण असल्यास तारण नसलेली कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करुन त्याची दिलेल्या पध्दतीने विक्री करुन या रक्कमेतून ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदीनुसार देयबाकी रक्कमेची खात्री करुन संबंधितांना विलंबीत कालावधीसाठी 15 टक्के व्याजासह देण्यासाठी संबंधित जिल्हाधिकार्यांना कारवाई करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.
दरम्यान, साखर आयुक्तालयाने हंगाम 2024-25 मध्ये थकीत एफआरपीप्रश्नी आत्तापर्यंत एकूण 28 साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश दिलेले आहेत. ही रक्कम सुमारे 545 कोटी 88 लाख 78 हजार रुपये असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.
जप्तीची कारवाईचे आदेश देण्यात आलेली साखर कारखान्यांची नांवे व आरआरसी रक्कम पुढीलप्रमाणे...
पुणे जिल्ह्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, इंदापूर - 8 कोटी 58 लाख 54 हजार रुपये, सोलापूरमधील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.लवंगी-ता.मंगळवेढा - 1 कोटी 27 लाख 54 हजार रुपये, सोलापूरमधील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.आलेगांव,ता.माढा - 2 कोटी 95 लाख 9 हजार रुपये, सोलापूरमधील भीमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर- 1 कोटी 26 लाख 27 हजार रुपये, अहिल्यानगरमधील केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगर - 25 कोटी 76 लाख 5 हजार रुपये, जालना जिल्ह्यातील समृध्दी शुगर्स लि.रेणूकानगर,ता.घनसावगी-13 कोटी 63 लाख 42 हजार रुपये, यवतमाळमधील डेक्कन शुगर्स प्रा.लि., मंगलोर- 1 कोटी 11 लाख 9 हजार रुपये आणि बुलडाणा जिल्ह्यातील पेनगंगा शुगर फॅक्टरी प्रा.लि.,वरुडधाड - 2 कोटी 74 लाख 9 हजार रुपयांचा समावेश आहे.