पुणे: महापालिकेने मोबाईलचे बिल भरले नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोबाईलची आऊटगोईंग सेवा सोमवारी (दि.19) दुपारी दोन तास बंद पडली होती. ऐन कामकाजाच्या कालावधीतच सेवा बंद पडल्याने अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच हवालदिल झाले. त्याचा थेट परिणाम कामकाजावर ही झाला. (Latest Pune News)
महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचार्यासाठी एका खासगी मोबाईल कंपनीकडून सीमकार्ड सेवा घेण्यात आली आहेत. जवळपास तीन ते साडेतीन हजार कार्ड आहेत. पोस्ट पेड पद्धतीची ही सेवा असून त्याचे बिल महापालिकेकडून भरले जाते. गेल्या दोन दिवसांपासून यामधील अनेक मोबाईल क्रमांकावर बील न भरल्याने आऊटगोईंग सेवा आणि इंटरनेट सेवा बंद करण्याच्या सूचना मोबाईल कंपनीकडून देण्यात येत होत्या.
त्यामुळे संबधित अधिकारी कर्मचारी यांनी महापालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागास याबाबत कल्पानाही दिली. मात्र, बिले भरली आहेत, असे उत्तर संबधित विभागाकडून देण्यात आले. असे असतानाच सोमवारी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी दुपारनंतर अनेक अधिकारी- कर्मचार्यांची आऊटगोईंग सेवा तसेच इंटरनेट सेवा बंद पडली. त्यामुळे अधिकार्यांची चांगलीच गैरसोय झाली. त्यानंतर संबधित विभागास हा प्रकार कळविण्यात आला. मात्र, त्यानंतर जवळपास दोन तासांनी ही सेवा पूर्ववत झाल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
महापालिकेची मोबाईलची कोणतीही बिले थकलेली नव्हती. संबंधित कंपनीची ही चूक आहे. त्यांना पालिकेकडून नोटीसही बजाविण्यात येणार असून, याप्रकरणी कंपनीकडे तक्रार केली जाणारे आहे.
- राहुल जगताप, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी