

पुणे: सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. पुण्यात काँग्रेसला पुन्हा हादरे बसण्याची शक्यता असून, काही माजी नगरसेवकांसह पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आता दिवाळी आधीच महपालिका निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. येत्या काही दिवसांत प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग येण्यास सुरुवात झाली आहे. (Latest Pune News)
महायुतीने एकत्र येऊन निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तेसमवेत राहिल्यास त्याचा निवडणुकीत फायदा होईल, या हिशोबाने महाविकास आघाडीतील काही इच्छुक आता महायुतीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. प्रामुख्याने आघाडीतील काँग्रेसमधील काही माजी नगरसेवक व पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे समजते.
त्यामधील काही पदाधिकार्यांनी पवारांच्या गाठी-भेटी घेतल्याचेही आता समोर आले आहे. लवकरच या सर्वांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे समजते. त्यात प्रामुख्याने शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोमेंन्टमधील काही मात्तबर माजी नगरसेवक आणि पदाधिकार्यांचा समावेश आहे. महापालिका निवडणूक जाहीर होण्याआधीच पक्ष प्रवेश केला तर प्रभाग रचनेपासून उमेदवारीपर्यंतच्या सर्वंच बाबींना अनुकुलता मिळेल, या हिशोबाने ही लगबग सुरू असल्याचे समजते.