ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूर हद्दीत आवळी शिवारात भरदिवसा बिबट्याने हल्ला करून एका तरुण शेतकऱ्यास गंभीर जखमी केले. यामुळे अवघा ओतूर परिसर हादरून गेला आहे. धनंजय नारायण डुंबरे (वय ३१) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना विजय त्र्यंबक घोलप यांच्या शेतात बुधवारी (दि. ११) दुपारी १ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय डुंबरे हे दुपारी १ वाजेच्या सुमारास कांद्याच्या पिकाला पाणी भरत होते. त्यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. अनपेक्षित हल्ल्यामुळे धनंजय गंभीर जखमी झाले. त्यांच्या हात-पाय व पोटावर जखमा झाल्याचे समजते. त्यांच्या आरडाओरडीनंतर शेजारील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांचा आवाज व गोंधळ ऐकून बिबट्याने शेतातून पळ काढला.
जखमी धनंजय डुंबरे यांना तातडीने ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वनकर्मचारी विश्वनाथ बेले यांनी दिली आहे. जखमी डुंबरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे व कर्मचारी विश्वनाथ बेले, सारिका बुट्टे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी यापूर्वीही ग्रामस्थांनी केल्या होत्या; मात्र प्रत्यक्ष भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे ओतूर व परिसरातील शेतकरी धास्तावले असून, दिवसा देखील शेतात जाण्यास भीती वाटत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.