चित्रपटांमधून समाजात आशावाद : दिग्दर्शक-अभिनेते गौतम घोष यांचे मत

चित्रपटांमधून समाजात आशावाद : दिग्दर्शक-अभिनेते गौतम घोष यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांत आपण जगात युद्धांची मालिका पाहिली आहे, अनुभवली आहे. माणूस युद्ध थांबवू शकत नाही. युद्ध सुरू राहतील. पण, त्याला विरोध करण्याचे काम साहित्यिक आणि दिग्दर्शक करत राहतील. कारण, चित्रपट आणि साहित्य हे बदल घडवू शकतात. त्यामुळे चित्रपटांकडे आशेने पाहिले पाहिजे. चित्रपटांनीही नेहमी समाजाला आशावाद दिला आहे, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक – अभिनेते गौतम घोष यांनी व्यक्त केले.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजिलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) उद्घाटन दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गौतम घोष यांना 'पिफ डिस्टींग्वीश अ‍ॅवार्ड' प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ रेडिओ उद्घोषक अमीन सयानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना 'पीफ डिस्टींग्वीश अ‍ॅवार्ड' प्रदान केला.

तसेच, संगीतकार आणि गायक एम. एम. किरवानी यांना संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्काराने गौरविण्यात आले. सयानी यांना त्यांच्या निवासस्थानी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविले. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, फाउंडेशनचे रवी गुप्ता, सतीश आळेकर आदी उपस्थित होते. सुव्रत जोशी आणि श्रेया बुगडे यांनी सूत्रसंचालन केले. 'अ ब्रायटर टुमारो'ही ओपनिंग फिल्म दाखवण्यात आली.

ऑस्कर विजेत्या संगीतकाराने गायले 'तोच चंद्रमा…'

महाराष्ट्राबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला, असे ऑस्कर विजेते संगीतकार, गायक एम. एम. किरवानी यांनी सांगितले. यावेळी मित्र अमोल पालेकर यांनी ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचे गाणे ऐकवल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर फडके यांचे 'तोच चंद्रमा नभात' हे गीत सादर करुन त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. किरवानी म्हणाले, एस. डी. बर्मन हे जगातील अतिशय प्रतिभावान संगीत दिग्दर्शक होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे माझ्यासाठी भाग्य आहे.

सांस्कृतिकमंत्र्यांची अनुपस्थिती

पिफच्या आयोजनात राज्य सरकारचा सहभाग असल्याने महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार येणार होते. मुख्य उद्घाटन सोहळा आणि पुरस्कार वितरण सोहळा त्यांच्या हस्ते होणार होता. मात्र, मुनगंटीवार उद्घाटन सत्रालाच उपस्थित राहिले नाहीत.

राज्य सरकार लवकरच चित्रपटाबद्दल एक धोरण आणणार आहे. त्याचा चित्रपट तयार करणार्‍या स्थानिक तरुणांना खूप फायदा होणार आहे.

अविनाश ढाकणे, व्यवस्थापकीय संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news