पुणे: हडपसरचे शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी शिवबंधन सोडून मंगळवारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी पवार पक्षात असलेले माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नीलेश मगर यांच्यासह दोन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीला पुण्यात धक्का बसला आहे.
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश झाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदारांसह चार माजी नगरसेवक पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची हडपसर मतदारसंघात ताकद वाढली आहे. (Latest Pune News)
सेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी आमदार बाबर हे विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, हा हडपसर मतदारसंघ पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर गेला. त्यांनी राष्ट्रवादी पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, दोन्ही पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते.
तर माजी उपमहापौर गायकवाड, मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे व हेमलता मगर तसेच स्वीकृत नगरसेवक अजित ससाणे हे राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्यासमवेत राहिले होते. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीची राजकीय गणिते लक्षात घेऊन या सर्वांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ‘घरवापसी’ केली आहे.
आमदारांसह शहराध्यक्षांची अनुपस्थिती
माजी आमदारांसह चार माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असतानाच या पक्ष प्रवेशाला हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्यासह राष्ट्रवादीचे पूर्व भागाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे अनुपस्थित होते.
या अनुपस्थितीमागील नक्की कारण समजू शकले नाही. याबाबत तुपे म्हणाले, पूर्व नियोजित कार्यक्रमांमुळे मला या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही, तर टिंगरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.