

पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने जून 2025 च्या यूजीसी नेट परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 25 आणि 26 तारखेच्या परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध करण्यात आले आहे.
यूजीसी नेट परीक्षा 25 ते 29 जून दरम्यान घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांना विषयवार वेळापत्रक https://ugcnet.nta.ac.in या अधिकृत पोर्टलवर पाहता येणार आहे. (Latest Pune News)
ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाईल, ज्यामध्ये 85 विषयांचा समावेश असणार आहे. एजन्सीने 25 ते 28 जूनच्या परीक्षांसाठी परीक्षा शहर सूचना स्लिपदेखील प्रसिद्ध केल्या आहेत. परीक्षेच्या शहर स्लिपवर, उमेदवार त्यांचे परीक्षा केंद्र कुठे असतील त्या शहराचे नाव शोधू शकतात.
तसेच हॉलतिकीटवर परीक्षा केंद्राची माहिती आणि इतर माहितीदेखील दर्शवण्यात आली आहे. यूजीसी नेट जून 2025 दोन सत्रांत होणार आहे. पहिले सत्र सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरे सत्र दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत असेल. तर प्रश्नपत्रिकांमध्ये दोन विभाग असतील, दोन्हीमध्ये वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्न असतील.
असे करा हॉलतिकीट डाऊनलोड (How to download hall ticket)
उमेदवारांनी प्रथम एनटीएच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर युजीसी नेट जून 2025 प्रवेशपत्र डाउनलोड शीर्षकाची लिंक पहा. नंतर तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन एंटर करा. क्रेडेन्शियल्स एंटर करा. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट करा. उमेदवारांना त्यांच्या प्रवेशपत्रावर छापलेली तारीख, शिफ्टची वेळ आणि ठिकाण यासह सर्व माहिती पुन्हा तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.