

सुनील माळी
पुण्यातील वाहतुकीच्या तीन महत्त्वाच्या योजना मार्गी लावण्यासाठी द्विस्तरीय रचना असलेली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याच्या आपल्या घोषणेबद्दल प्रथम पुणेकरांतर्फे आपले अभिनंदन... वाहतुकीच्या अभ्यासाचे अनेको संस्थांचे अहवाल, अनेको योजना, वेगवेगळ्या यंत्रणा या गदारोळात दिशाहीन, अशास्त्रीय अशी वाहतूक रचना उभी राहिली आहे. शहरी वाहतूक नियोजनबद्ध व्हावी, यासाठी थेट केंद्र सरकारने आदेश दिल्यानुसार स्थापण्यात आलेले एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण-उमटा केवळ जुजबी आदेश देण्यासाठी बैठक घेणारी कागदी समितीच कशी राहील, याची दक्षता सर्व सरकारी बाबूंनी घेतली होतीच. मुख्यमंत्रीसाहेब, या भीषण परिस्थितीत किमान तीन योजनांना तरी योग्य दिशा मिळावी, यासाठी आपण उचललेले पाऊल अंधारात पणतीचे काम निश्चितच करेल; पण संपूर्ण पुणे महानगरासाठी आखायच्या आणि अमलात आणायच्या शास्त्रीय आराखड्याची ती सुरुवातही ठरेल, असा विश्वास बाळगू ना?
पुण्याच्या वाहतूक समस्येवर उपाय सुचवण्यासाठी नव्वदीच्या दशकापासून वेगवेगळ्या समित्या नेमल्या जात आहेत. पुण्याच्या नागरी समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी माजी सचिव कृ. ग. परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने ३१ मे १९९१ ला सादर केलेल्या अहवालात वाहतुकीच्या समस्येबाबतही अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. त्यानंतर निव्वळ वाहतूक समस्यांसाठी अनेक तज्ज्ञांच्या सल्लागार समित्या नेमण्यात आल्या. परांजपे समितीपासून ते विल्बर अँड स्मिथ कंपनीने केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यापर्यंतच्या (सीएमपी) अहवालांची बाडे महापालिकेच्या वेगवेगळ्या मजल्यांवरील कपाटात लावून ठेवण्यात आली आहेत. 'सार्वजनिक वाहतूक यंत्रणा मजबूत करावी आणि त्यातही पीएमपीला प्राधान्य द्यावे,' असेच या अहवालांच्या तसेच अनेक वाहतूकतज्ज्ञांच्या शिफारशींचे सार होते. पुण्याचे नियोजन म्हणजे केवळ महापालिकेच्या नव्या-जुन्या हद्दीचे नियोजन ही संकल्पना बदलत्या काळानुसार मागे पडली आणि पुणे महानगर क्षेत्राचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली. त्यानुसार पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए)ची स्थापना आणि त्यांच्या विकास आराखड्याची आखणी करण्यात आली तसेच वाहतूक आराखडा एल अँड टी कंपनीने तयार केला. आता पीएमआरडीएच्या आर्थिक विकासाचा स्वतंत्र आराखडा मँकेन्झी कंपनी करीत असून, या क्षेत्राच्या स्ट्रक्चरल प्लॅनचे कामही सुरू आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी घाईघाईने बीआरटीची संकल्पना अशास्त्रीयरीत्या राबवण्यात आली आणि दुर्दैवाने या योजनेचा नुकताच मृत्यू झाला, मेट्रोचे काही मार्ग सुरू झाले.
पण, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजेच फीडर बससेवा अजून सक्षम झालेली नाही. त्यात पीएमपीला बळ न देताच एसटीच्या कार्यक्षेत्रातही तिचे मार्ग सुरू केल्याने ती अकार्यक्षम ठरली. पुणे-लोणावळा लोकलच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकांची योजना अनेक वर्षे लटकल्याने दौंड-पुणे-लोणावळा मार्गावर सक्षम लोकलसेवा हे स्वप्नच राहिले. शहराच्या वाहतुकीची समस्या सत्तर टक्क्यांनी सोडवण्याची क्षमता असलेल्या शहरांतर्गत रिंगरोड म्हणजेच उच्च क्षमता द्रुतगती मार्ग-एचसीएमटीआर योजना आखणीच्या पातळीवरच अनेक वर्षे रखडली. या वेगवेगळ्या वाहतूक योजना-यंत्रणांमध्ये समन्वय साधून, त्यांचा एकत्रित आराखडा करण्यासाठी आणि तो त्यांच्याकडून अमलात आणण्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरणाची-उमटाची स्थापना करण्याची केंद्र सरकारची सूचना अनेक वर्षे फायलीत राहिली. अखेरीस या योजनांचा निधीच सरकारने रोखल्याने संबंधितांचा नाइलाज झाला आणि प्राधिकरणाच्या नावाने एक समिती नेमण्यात आली. सर्व वाहतूक यंत्रणांनी रिपोर्ट करणारे आणि प्रकल्प मंजुरीपासून ते संपूर्ण प्रदेशाच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार असणारे प्राधिकरण अपेक्षित असताना केवळ बैठका घेऊन आढावा घेणारी समिती अस्तित्वात आली. या साऱ्या कडबोळ्याचा परिणाम? सार्वजनिक वाहतूक यंत्रणा मजबूत नसल्याने खासगी वाहनांची संख्या बेसुमार वाढली. त्यामुळे वाहतूक कोंडी, मानवी तासांची हानी, प्रदूषण आदी गंभीर दुष्परिणाम पुणेकर भोगत आहेत.
...फडणवीसजी, अशा पद्धतीच्या दहा दिशांना दहा तोंडे असणाऱ्या वाहतूक यंत्रणा आणि योजनांनी पुणे महानगराची वाहतूक समस्या अधिकच उग्र बनली असतानाच तुम्ही किमान तीन योजनांना मार्गी लावण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा आदेश काढणे हा पुणेकरांसाठी आशेचा किरण ठरू शकेल...
...मात्र, या तीन योजनांबाबत पुणेकरांतर्फे काही सूचना मांडाव्याशा वाटतात.
पहिली योजना
भूमिगत बोगदा घाटापलीकडे न्या अन् तिसरे पुणे वसवा
पाताळलोकची घोषणा तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात केली आणि त्यात आता येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाच्या आखणीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. वाहतुकीची जमिनीची क्षमता संपल्याने भूमिगत मार्ग हा चांगला पर्याय ठरू शकतो; पण ही योजना केवळ कात्रजपर्यंत न थांबवता ती पुढे घाटाच्या पोटातून पलिकडे शिंदेवाडीपर्यंत न्यावी. त्यामुळे कात्रज घाटाच्या पलिकडे शिंदेवाडीपासून खेडशिवापूर परिसरापर्यंत पुण्याचा विस्तार होईल. आपण तिसऱ्या मुंबईनंतर चौथ्या मुंबईचे स्वप्न पाहत आहात तसेच पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड परिसर हे दुसरे पुणे जसे झाले तसेच तिसरे पुणे-सातारा रस्त्यावर विकसित होऊ शकेल आणि पुण्याच्या विकेंद्रीकरणाने समतोल विकास शक्य होईल.
दुसरी योजना
एचसीएमटीआरवर निओ मेट्रो हवी
उच्च क्षमता द्रुतगती मार्गाला (एचसीएमटीआर) गती देण्याचा आपला निर्णय हा खरोखरीच अत्यंत योग्य आहे. मात्र, ही योजना नेमकी कधी आणि कशी आखण्यात आली? ते समजावून घेऊन तशीच अंमलबजावणी करणे आवश्यक ठरेल. शहरातला अंतर्गत वर्तुळाकार रस्ता अशी ती कल्पना १९८७ च्या विकास आराखड्यात मांडण्यात आली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो केवळ सार्वजनिक वाहनांसाठीच राखीव ठेवण्यात आला होता. तो प्रकल्प अनेक दशके रखडला आणि त्यानंतर गेल्या दशकात त्याच्या आखणीसाठी हालचाली सुरू झाल्या. पण, तो खासगी वाहनांसाठी करून बससाठी केवळ एकच लेन ठेवण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला. हा प्रस्ताव अत्यंत चुकीचा होता, हे जाणून आपणच २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री असताना निओ मेट्रोने एचसीएमटीआर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे हा रस्ता खासगी वाहनांसाठी न राहता केवळ सार्वजनिक वाहनांसाठीच राहणार होता. तो प्रस्ताव का मागे पडला? ते समजले नाही. तसेच पिंपरीच्या आराखड्यातही या मार्गाचे आरेखन असून, हॅरिस पुलाशेजारून त्या मार्गाला पुण्यातील मार्ग जोडल्यास पुणे-पिंपरी जोडली जाईल आणि दोन्ही शहरांतील खासगी वाहनांची संख्या आटोक्यात राहील.
तिसरी योजना
रिंग रोडलगत रिंग रेल्वे व्हावी
रस्ते विकास महामंडळाच्या बाह्य रिंग रोडचे काम वेगात सुरू झाले असताना त्या तुलनेत पीएमआरडीएचा अंतर्गत रिंग रोड मागे पडला होता. तो मार्गी लावण्याचा तुमचा आदेशही पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. हा रिंग रोड ८३ किलोमीटरचा असणार आहे आणि अनेक उपनगरे तसेच महामार्गांनाही जोडणारा असेल. त्यामुळे वेगवेगळे भाग एकमेकांना जोडले जातील आणि सार्वजनिक वाहतुकीचे जाळे निर्माण होईल. मात्र, पीएमआरडीएच्या रिंग रोडलगत रिंग रेल्वेसाठीही मार्गिका ठेवावी. रेल्वेमुळे मुंबईच्या उपनगरांप्रमाणेच पुण्याच्या उपनगरांचा विकास होईल. मात्र, ती मार्गिका मेट्रो नसावी, तर मुंबईच्या लोकलप्रमाणे असावी. त्यामुळे ती पुणेकरांना परवडू शकेल आणि पीएमआरडीएच्या क्षेत्रात उत्तम वाहतूक यंत्रणा मिळण्याबरोबरच नव्या पुण्याची झपाट्याने वाढ होऊ शकेल.
...आपण पुण्यात लक्ष घालत आहात आणि पुणेकरांची वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी समितीचे पाऊल उचलले आहे... त्या पावलांना आणखी गती मिळावी आणि पुणेकरांचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावे,
एवढीच अपेक्षा...