

मंचर: मंचर परिसरातील दूध भेसळ प्रकरणात तब्बल १५ वर्षांपूर्वी घोडेगाव न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळालेल्या येथील संदीप कांतीलाल लोढा याचे नाव पुन्हा एकदा राज्यव्यापी दूध भेसळ रॅकेटमध्ये आल्याने खळबळ उडाली आहे.
पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या दूध भेसळ प्रकरणात संदीप लोढा हा मुख्य सूत्रधार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यासह २५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सन २००५ मध्ये मंचर येथे दूध भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या संशयित पावडर प्रकरणात संदीप लोढावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, तपासातील त्रुटी आणि पुराव्याअभावी घोडेगाव न्यायालयाने २०११ मध्ये त्याची निर्दोष मुक्तता केली. आता त्याच व्यक्तीचे नाव पुन्हा राज्यभर गाजणाऱ्या दूध भेसळ रॅकेटमध्ये समोर आल्याने तपास यंत्रणांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
दूध भेसळीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, आर्थिक व्यवहारांची व्याप्ती किती मोठी आहे आणि या रॅकेटमागील आणखी कोणते मोठे चेहरे समोर येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील "मोठे मासे" गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.