

आळंदी: रौद्ररूप धारण केलेल्या इंद्रायणी नदीचे पाणी अखेर ओसरल्याने आळंदीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, महापुराचे पाणी ओसरले असले, तरी अनेक कुटुंबे आणि व्यावसायिकांवर कोसळलेल्या संकटाची तीव्रता कायम आहे.
अनेकांच्या घरात पाणी शिरून संसार उद्ध्वस्त झाला, तर अनेक लहान व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेले लाखो रुपयांचे पत्राशेड मंडप, दर्शनबारी, स्कायवॉक पुलावरील व्यवस्था, पसायदान मंचावरील भव्य पत्राशेड, महिलांसाठी उभारलेल्या चेंजिंग रूम तसेच पोलिस टेहळणी नाके महापुरात वाहून गेल्याचे मंडप व्यावसायिकांनी सांगितले.
इंद्रायणीकाठावरील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचा माल खराब झाला असून, काही दुकाने थेट पुरात वाहून गेली आहेत. आषाढी यात्रेच्या गर्दीचा विचार करून पान-फूल, प्रसाद विक्रेते आणि इतर छोट्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात माल साठवून ठेवला होता.
मात्र, पुराच्या पाण्यामुळे देवाचे फोटो, पुस्तके, प्रसाद, पूजेचे साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मंडप व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि पथारी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
इंद्रायणी नदीघाटालगतच्या गोपाळपुरा परिसरातील धर्मशाळा आणि घरांमध्येही पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. पूर ओसरल्यानंतर नागरिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत असले, तरी अद्याप अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
शासनाकडून वेळेत मदत मिळणार का? असा प्रश्नही पूरग्रस्तांकडून उपस्थित केला जात आहे. पुरानंतर परिस्थिती सावरण्यासाठी नागरिक पुन्हा उभारी घेत असले, तरी शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वारकरी, भाविक, व्यावसायिक आणि नागरिकांकडून होत आहे.