

पुणे: शहरात पावसाचा जोर वाढला आहे. मे आणि जून महिन्यात धरणक्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे जवळपास निम्मी भरली आहेत. असे असताना देखील शहरातील काही भागांत अजूनही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज 1300 टँकरद्वारे काही भागांतील पुणेकरांची तहान भागवली जात आहे.
महापालिकेला शहरासह उपनगर परिसरात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पावसाळ्यात देखील कसरत करावी लागत आहे. शहराच्या काही भागांत पाणी सुरळीत मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. (Latest Pune News)
काही भागांत गढूळ व अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या देखील तक्रारी आहेत. सर्वांत भीषण परिस्थिती नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आहे. या गावांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे अपुरे असल्याने टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. या उलट शहरात जलवाहिन्यांचे जाळे असूनदेखील काही भागांत पाणीपुरवठा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. यामुळे त्यांना देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज सुमारे दीड ते दोन लाख पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
पुण्यात एप्रिल महिन्यात टँकरची मोठी मागणी होती. ही मागणी मे महिन्यात आणखी वाढली. मे महिन्याच्या अखेरीस पुण्यात जोरदार पाऊस पडला. पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली. पावसामुळे धरणे निम्मे भरली. जून महिन्यात देखील पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासला धरणसाखळीतील धरणे भरली.
त्यामुळे पुण्यावरील पाणीकपातीचे संकट टळले. सध्या धरणात पाण्याचा मुबलक साठा आहे. असे असताना देखील काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा महापालिकेला करावा लागत आहे. हा पाणीपुरवठा अनियमित असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेची 8 टँकर भरणा केंद्रे आहेत. मे महिन्यात तब्बल 44 हजार 800 टँकरद्वारे शहराला पाणी पुरवण्यात आले होते. जून महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे ही मागणी कमी झाली. जून महिन्यात साधारण रोज 1300 टँकरने पाणी नागरिकांना पुरविण्यात आले, तर संपूर्ण महिन्यात 39,200 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
शहरात दररोज 17 ते 18 एमएलडी पाणीपुरवठा
पालिका व खासगी टँकर मिळून शहरात दररोज सुमारे 17 ते 18 एमएलडी पाणीपुरवठा करतात. जर हे सर्व पाणी थेट नागरिकांना वितरित केले, तर ते अंदाजे 1.50 हजार लोकांची गरज भागवू शकते. मात्र, संपूर्ण शहरासाठी पालिका दररोज सुमारे 1750 एमएलडी पाणी पुरवते, ज्यात टँकरच्या पाण्याचे प्रमाण 1 ते सव्वा टक्के आहे.
शहरात 13 ठिकाणी टँकरभरणा केंद्र
शहरात वडगाव शेरी, रामटेकडी, सासवड फाटा, धायरी, पटवर्धनबाग, पर्वती, पद्मावती आणि चतुःशृंगी येथे पालिकेची आठ टँकर भरणा केंद्र आहेत. या केंद्रांमधून दररोज सुमारे 1300 टँकरद्वारे मागणीनुसार पाणी वितरित केले जाते. यातील सर्वाधिक पाणी टँकरद्वारे नव्याने समाविष्ट 34 गावांसाठी पुरविले जातात.
लॉबीचा दबदबा कायम
शहरात खासगी टँकर लॉबी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. हे टँकरचालक रोज 250 ते 300 खासगी टँकर महापालिकेच्या केंद्रांवरून पाणी भरून नेतात व ते पाणी प्रति 10 हजार लिटरसाठी 1500 ते 2 हजार रुपयांना नागरिकांना विकतात.
या टँकर फेर्यांची संख्या वर्षाला तब्बल 4 लाखांच्या वर असून, अनेकांना पैसे घेऊन पाणी विकत घ्यावे लगत आहे.
शहराला मे महिन्यात 44 हजार 800 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. मे आणि जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने हा आकडा कमी होऊन 39200 टँकरवर आला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, पुढील काही दिवसांत टँकरची मागणी आणखी कमी होणार आहे.
- नंदकिशोर जगताप, विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभाग