Pune Politics: हडपसर मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार मिळाला नसल्याने शेजारच्या मतदारसंघातून आणलेला उमेदवार हा मतदारांना नको आहे. स्थानिक आमदारच हडपसरचा विकास करू शकतो. त्यामुळे मतदारांनी आपल्या महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना दुसर्यांदा आशीर्वाद, असे आवाहन शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार भरत गोगावले यांनी केले.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तुपे पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोगावले बोलत होते.
या वेळी कर्नाटकचे आमदार प्रताप कुमार गौडा, आमदार योगेश टिळेकर, उल्हास तुपे, मारुती तुपे, अभिमन्यू भानगिरे, अभिजित बोराटे, संतोष रजपूत, संजय लोणकर, डॉ. शंतनू जगदाळे, सविता घुले, मनोज घुले आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार टिळेकर म्हणाले, महायुतीचे उमेदवार तुपे यांना निवडून आणण्याकरिता आम्ही कंबर कसली आहे. हडपसरमध्ये तुपे आणि भानगिरे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झालेली आहेत. तर भानगिरे म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता त्यांनी अनेक योजना आणल्या आहेत. हडपसरचा हायटेक विकास आम्ही करणार आहोत.