शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्या हृदयात आहेत. त्यांचा आदेश अंतिम मानला आणि महाआघाडीचा धर्म पाळत आलो. कंबर कसून शिवसैनिकांनी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणले. पण परत परत तेच मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांना तिकीट नाहीच, कुठंवर दुसर्याच्या भाकरी शिवसैनिकांनी भाजायच्या असा रोखठोक सवाल माजी आमदार महादेव बाबर यांनी उपस्थित केला आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी कोंढवा खुर्द, मिठानगर परिसरात दुचाकी रॅली आणि पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्याचा सपाटा लावला आहे. या वेळी मार्गदर्शन करताना महादेव बाबर बोलत होते. विविध पक्षांतील अनेक संघटना, नाराज गट आणि हजारो मुस्लिम बांधवांनी बधे यांना पाठिंबा दिला.
साईबा ग्रुपचे सदस्य पदाधिकारी, शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र बाबर, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, भरत चौधरी, माजी नगरसेविका मेघा बाबर, प्रसाद बाबर, नदीम शेख, सादिकभाई पटेल, उस्मान शेख, श्रीकांत पवार, प्रदीप पवार आदींसह हजारो सर्वधर्मीय नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते.
निष्ठावंत शिवसैनिक गंगाधर बधे म्हणाले की, सत्ता नसेल, कोणतेही पद नसेल तर, शिवसैनिकांनी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणाकडे जायचं? आघाडी म्हणता ना? मग त्याचा धर्म सगळ्यांनी पाळायला हवा, पण तसे होताना दिसत नाही. म्हणूनच, मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे आणि शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम करणार आहे.