Pune Political News: आमदार असूनही मुळशी बाजार समिती स्थापन करता आली नाही. भोर बाजार समितीची तसेच बसस्थानकाची दयनीय अवस्था आहे. लोकप्रतिनिधी खमका लागतो. हेलपाटे मारायला लावणारा नसावा लागतो.
समस्या सोडविण्यासाठी आमदाराच्या अंगात पाणी असावे लागते, तरच तो काम करतो अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोटावडे (ता. मुळशी) येथे केली. मतांची विभागणी व्हायची त्यात फावलं जायचं. यंदा मुळशीकरांना आमदारकीची संधी असून या संधीचे सोने करावे, असे आवाहन या वेळी त्यांनी केले. भोर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली, या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी धीरज शर्मा, प्रवीण शिंदे, सुनील चांदेरे, बाळासाहेब चांदेरे, शरद ढमाले, रणजित शिवतरे, बाबूराव चांदेरे, चंद्रकांत बाठे, भालचंद्र जगताप, भगवान पासलकर, राजाभाऊ हगवणे, रेवणनाथ दारवटकर, विक्रम खुटवड, राजेंद्र बांदल, श्रीकांत कदम, अंकुश मोरे, अमित कंधारे, दीपक करंजावणे, सारिका मांडेकर, वैशाली गोपालघरे, चंदा केदारी, नीता नांगरे, अमोल शिंदे, प्रशांत रानवडे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतांसाठी आमदारांचे कुटुंब फिरतेय गावोगावी : मांडेकर
आमदार संग्राम थोपटे यांच्याबरोबर राष्ट्रवादी असल्यामुळे त्यांना मताधिक्य मिळत होते; मात्र गेली 15 वर्षे त्यांनी खोटी आश्वासने दिली. सध्या आमदाराचे कुटुंब गावोगावी फिरत आहे. भोर, राजगड व मुळशीला समस्यांनी घेरले आहे, असे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी सांगितले.