पानशेत खोर्‍यात 50 टक्केच पाऊस

पानशेत खोर्‍यात 50 टक्केच पाऊस
Published on
Updated on

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पानशेत, वरसगाव खोर्‍यात गुरुवारी (दि. 13) सकाळपासून तुरळक पावसाचा अपवाद वगळता कडकडीत ऊन पडले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला धरण साखळीत 50 टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे साखळीतील पाणीसाठा जवळपास 30 टक्क्यांनी कमी आहे. सायंकाळी 5 वाजता धरण साखळीत 8.28 टीएमसी म्हणजे 28.42 टक्के पाणीसाठा होता, तर गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरण साखळीत 12.23 टीएमसी म्हणजे 41.96 टक्के पाणीसाठा होता.

गेल्या वर्षी 13 जुलै रोजी खडकवासला धरण जवळपास 100 टक्के भरले होते, तर पानशेत-मुठा खोर्‍यात अतिवृष्टीचे थैमान सुरू होते. त्यामुळे पानशेत धरणामध्ये 40 टक्के, वरसगाव 38.67 टक्के, तर टेमघर धरणात 27.67 टक्के पाणीसाठा झाला होता, तर 1 जून ते 13 जुलै 2022 पर्यंत टेमघर धरण परिसरात 1173 मिलिमीटर, वरसगाव 941 मिलिमीटर, पानशेत 981 मिलिमीटर, तर खडकवासला येथे 263 मिलिमीटर पाऊस पडला होता. धरण साखळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 50 टक्केच पाऊस पडला आहे.

यंदा 1 जून ते 13 जुलै 2023 पर्यंत टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात 745 मिलिमीटर, वरसगाव 481 मिलिमीटर, पानशेत 457 मिलिमीटर, तर खडकवासला येथे केवळ 133 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभरात टेमघर व खडकवासला धरण परिसरात पावसाची नोंदच झाली नाही, तर पानशेत, वरसगाव येथे तुरळक एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पानशेतच्या पाण्यावर पुणेकरांची तहान भागवली जाणार?

1972च्या दुष्काळातही जून-जुलैमध्ये पानशेत खोर्‍यात चांगला पाऊस पडला होता. त्यानंतर पाऊस गायब झाला होता. त्यावेळी वरसगाव व टेमघर धरणे नव्हती. असे असतानाही पानशेतच्या पाण्यामुळे पुणेकरांची तहान भागवली जात होती. यंदाच्या हंगामात असेच चित्र आहे. पानशेत, वरसगाव धरणांखालील भागात पावसाने दडी मारली आहे. मात्र, रायगड जिल्ह्यालगतच्या तव, दापसरे, दासवे, धामणहोळ खोर्‍यातील पावसामुळे धरणसाठ्यात भर पडली आहे. दोन दिवसांपासून या खोर्‍यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी पावसाळी वातावरण कायम आहे. तुरळक पावसासह अधूनमधून रिमझिम सुरू आहे, त्यामुळे पावसाच्या आशा कायम आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत धरण साखळीत जवळपास 14 टक्के कमी पाणीसाठा आहे. पावसाअभावी कमी पाणी असले तरी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार 15 ऑक्टोबर रोजी पाणी वाटपाचे नियोजन केले जाणार आहे.

मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news