पुणे: शहरात असंख्य अनधिकृत होर्डिंग उभे असतानाच महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांकडून फक्त 24 होर्डिंग अनधिकृत असल्याचा अहवाल आयुक्त नवलकिशोर राम यांना सादर केला आहे.
ही आकडेवारी पाहून आयुक्तांना धक्का बसला असून, आता अनधिकृत होर्डिंगची संख्या नक्की किती आहे, हे तपासण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे, त्यामुळे खोटी माहिती देणार्यांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले. (Latest Pune News)
पावसाळ्यांच्या तोंडावरच वाघोली येथे होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली होती. त्यामुळे होर्डिंगच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने जवळपास 2 हजार 400 होर्डिंगला परवानगी दिलेली आहे. तर संपूर्ण शहरात केवळ 24 अनधिकृत होर्डिंग असल्याचा दावा आकाश चिन्ह विभागाकडून करण्यात आला होता.
एकीकडे अनेक चौकात आणि रस्त्यालगत नियम धाब्यावर बसवून उभारलेले होर्डिंग दिसत असताना आकाश चिन्ह निरीक्षकांकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच या अनधिकृत होर्डिंगच्या आकडेवारीचा अहवाल महापालिका आयुक्तांना नुकताच सादर झाला आहे. 15 क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत केवळ 24 अनधिकृत होर्डिंग असल्याची आकडेवारी पाहून त्यांनाही धक्का बसला.
याबाबत माहिती देताना आयुक्त राम म्हणाले, अनधिकृत होर्डिंगची संखा प्रत्यक्षात अधिक असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे आपण स्वतंत्र टीम नेमून अनधिकृत होर्डिंगची तपासणी करणार आहोत. तसेच, या तपासणीत अहवालापेक्षा जास्त होर्डिंग सापडल्यास संबंधित अधिकार्यांवर कारवाई केली जाईल. तसेच जे 24 अनधिकृत होर्डिंग आहेत, त्यावर आठ दिवसांत कारवाई करावी, असे निर्देश दिले असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.