

दिवे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : यंदा पाऊस लांबल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. कडक उन्हाळा आणि पाण्याची कमतरता यामुळे सर्वच भाजीपाला सध्या महाग आहे. परिसरात कांद्याबरोबरच कांदापातीचेसुध्दा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळत असल्याने दिवे परिसरात कांदा पातीच्या उत्पादनाला पसंती दिली जात आहे.
कांदापात ही भाजीसाठी तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये वापरली जाते. त्यामुळे तिला विशेष मागणी असते, परंतु जास्त उष्णतेमुळे एप्रिल ते मे दरम्यान उगवण कमी होते. बाजारात मालाची आवक कमी होते व बाजारभाव जास्त मिळतो. दिवे येथील प्रगतशील शेतकरी मनोज झेंडे व तानाजी झेंडे या बंधूंनी चौदा गुंठे क्षेत्रावर कांदापातीचे पीक घेतले. शेततळ्यातील जेमतेम पाण्यावर त्यांनी हे पीक घेतले.
शेणखताचा जास्तीत जास्त वापर केला. सुरुवातीला वाफे तयार करून जमीन भिजवून घेतली. जमिनीत कांदा बी टाकून महिलांनी कुटळून घेतले. पाण्याची कमतरता असल्याने स्प्रिंकलरचा वापर केला. झेंडे यांना ओंकार कृषी सेवा केंद्राचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पीक काढणीला आल्यावर अत्यंत जोमदार होते व बाजारभावही सध्या एका जुडीला साधारण वीस रुपयांच्या आसपास आहे. याचा विचार करून अनेक व्यापार्यांनी शेतात येऊन कांदापातीला मागणी केली.
परंतु नवनाथ भापकर या व्यापार्याने सर्वाधिक पन्नास हजार रुपये देऊन ही कांदापात खरेदी केली. स्पिंकलरचा वापर करून कांदापातीचे पीक जोमदार आल्याने परिसरातील शेतकरी आवर्जून हा प्लॉट पाहण्यासाठी मनोज झेंडे यांच्या शेतात येत होते. पीक जोमदार आले आणि बाजारभाव मिळाला तर अशा नगदी पिकापासून चांगले उत्पादन मिळू शकते हे झेंडे बंधूंनी दाखवून दिले आहे. झेंडे यांंनी कांद्याचीसुध्दा लागवड केली होती. मात्र, बाजारभाव नसल्याने पदरी निराशाच पडली. मात्र, कांदापातीने त्यांना तारले.
हेही वाचा