

आळेफाटा: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी (दि. 12) कांद्याच्या आवकेत मोठी वाढ झाली. मात्र लिलावात कांदा बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे शेतकरीवर्गाच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. लिलावात चांगल्या प्रतीच्या दहा किलो कांद्यास 161 रुपये कमाल भाव मिळाला, अशी माहिती सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.
आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी झालेल्या कांदा भावातील घसरणीमुळे कांद्याची साठवण केलेल्या शेतकरीवर्गाचे पदरी मोठी निराशा पडली. अनेक शेतकरीवर्गाने उन्हाळ्यात काढणी झालेल्या कांद्यास त्यावेळेस समाधानकारक भाव नसल्याने कांद्याची साठवण केली. (Latest Pune News)
पावसाचा फटका साठवणूक केलेल्या कांद्यास बसू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे कांदा विक्रीशिवाय पर्याय राहिला नाही. त्यातच सध्याचा बाजारभाव हा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचे शेतकरी सांगतात.
आळेफाटा उपबाजारात जुलै महिन्याचे मध्यापासून पावसाचा फटका बसू लागल्याने कांदा आवक वाढली आहे. कांदा भावात घसरण सुरूच आहे. शुक्रवारी झालेल्या लिलावात कांदा भावात घसरण झाली. आजच्या लिलावात 22 हजार 223 गोणी विक्रीस आल्याची माहिती संचालक नबाजी घाडगे, सचिव रूपेश कवडे, कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.
लिलावात प्रतिदहा किलोस मिळालेले भाव (रुपयांत)
एक्स्ट्रा गोळा : 150 ते 161
सुपर गोळा : 130 ते 150
सुपर मीडियम : 110 ते 130
गोल्टी/ गोल्टा : 100 ते 110, 30 ते 90