

उरुळी कांचन: पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान प्रस्तावित समृद्धी मार्ग, तसेच पुणे शहरातील हडपसर ते यवत दरम्यानच्या उन्नत मार्गात बदल होण्याची शक्यता आहे. या उन्नत मार्गाबाबत लोकप्रतिनिधींनी काही मागण्या केल्या होत्या,त्यानुसार या मार्गात वरिष्ठ स्तरावर बदल करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आहे.
या बदलानुसार हडपसर ते यवत होणारा उन्नत मार्ग आता दौंड तालुक्याच्या हद्दीतील बोरीभडकपर्यंत करण्याचा निर्णय अंतिम होण्याची शक्यता आहे. समृद्धी मार्गाला जंक्शन स्वरूपात जोडण्याची कार्यवाही बोरीभडक हद्दीत होणार आहे,त्यामुळे उन्नतमार्ग भैरोबा नाला ते बोरीभडकपर्यंत करण्याची टेंडर प्रक्रिया अंतिम होण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. (Latest Pune News)
पुणे शहराभोवती प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने राज्य शासनाच्या स्तरावर हडपसर ते यवत तसेच वाघोली ते शिरूरपर्यंत दोन उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मार्गांचा डीपीआर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास
महामंडळाने तयार केला आहे. त्यानुसार या मार्गांची टेंडर प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू आहे.आता या प्रस्तावित मार्गात हडपसर ते यवत ऐवजी पुण्यातील भैरोबा नाला ते बोरीभडक (ता. दौंड) पर्यंत असा बदल करून महामार्ग विकसित करण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. हा मार्ग बोरीभडक जंक्शन पुढे जमिनीवरच सहापदरी करुन कासुर्डी पर्यंत विकसित करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
पूर्वीच्या प्रस्तावित मार्गातील उरुळीकांचन पासून पुढील यवत पर्यंतच्या भागात वाहतूक कोंडीचा फारसा प्रभाव नसल्याने हा मार्ग आता भौरोबाला नाल्यापासून बोरीभडक पर्यंतच उन्नत असणार आहे. या उन्नत मार्गात यापूर्वी लोणी काळभोरपर्यंत मेट्रोचा मार्ग प्रस्तावित होता. आता मात्र उरुळीकांचनपर्यंत मेट्रोचा मार्ग करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे या मार्गात पुढील टप्प्यात अनेक बदल होण्याचे अपेक्षित असल्याची चर्चा आहे.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा समृद्धीमार्ग विकसित करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे बोरीभडक येथे मार्गाला जोडणारे जंक्शन होणे क्रमप्राप्त होणार आहे. त्यामुळे मार्गात बदलाची शक्यता आहे. परंतु हा मार्ग जमिनीवरून कासुर्डीपर्यंत सहापदरी होणार असल्याचे निश्चित आहे.
- राहुल कुल, आमदार दौंड