

पुणे: "शारीरिक स्वास्थ्य, पर्यावरण सरंक्षणासाठी सायकल चालवणे अतिशय उपयुक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा दिला असून, त्यांनी दिलेल्या पंचसुत्रीवर पुणेकरांनी आपले आरोग्य चांगले राखावे," असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली व पुणे वॉकेथॉनमध्ये हजारो पुणेकर सहभागी झाले. सायकल रॅलीचा मार्ग कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, बालगंधर्व चौक, तर वॉकेथॉनचा मार्ग एसएनडीटी महाविद्यालयापर्यंत होता. (Latest Pune News)
माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. प्रसंगी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, क्रिकेटपटू केदार जाधव, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. विश्राम कुलकर्णी, जयंत भावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ७५ गरजू मुलामुलींना सायकल भेट देण्यात आली.
ठाकूर म्हणाले, "पुण्यातील पर्यावरण मित्रांनी (पीएम) देशाच्या प्राईम मिनिस्टरांना (पीएम) दिलेली ही मानवंदना आहे. मेधाताई यांच्याप्रमाणे इतर लोकप्रतिनिधींनीही असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी पुढाकार घ्यावा. देशवासीयांचे आरोग्य सदृढ व्हावे, यासाठी मोदी यांनी योगदिन, फिट इंडिया, खेलो इंडिया असे अनेक उपक्रम सुरु केले आहेत."
मिसाळ म्हणाल्या, "पुणेकरांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारावी, सायकल वापरल्यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होतेच पण आरोग्यदायी जीवन जगणेही शक्य होते. समाजात जनजागृती व्हावी यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. मेधाताईंनी घेतलेला हा उपक्रम पुणेकरांच्या शारीरिक व पर्यावरण स्वास्थ्याचा समतोल राखणारा आहे.
" सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे. सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांतून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होतोय, याचा आनंद वाटत असल्याचे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
जवळपास पाच हजार आबालवृद्ध यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. योगपटू स्वरा केंजळे, ट्रेकर नंदकिशोर मुळीक, आयर्न किड विहान काशीकर, जाॅगलिंग खेळाडू केतन अमोणकर यांचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. जयंत भावे यांनी सूत्रसंचालन केले. विश्राम कुलकर्णी यांनी आभार मानले.