आळेफाटा: कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारी (दि. 3) झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या दहा किलो कांद्यास 171 रूपये कमाल भाव मिळाला, अशी माहिती सभापती संजय काळे उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.
उन्हाळ्यात गावरान कांद्याची काढणी झाल्यावर अपेक्षित भाव नसल्यामुळे शेतकरीवर्गाने साठवणूक करण्यास प्राधान्य दिले. कांद्यास चांगले भाव मिळतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून असताना सध्या भाव घसरल्याने शेतकरीवर्गाची चिंता वाढली आहे.कांदा भावातील घसरणीमुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणने आहे. (Latest Pune News)
आळेफाटा उपबाजारात जून व जुलै महिन्याचे पहिल्या आठवड्यापर्यंत कांद्याचे भाव दहा किलोस दोनशे रुपयांवर होते. यानंतर हळुहळु भावात घसरण झाली. भाव दोनशे रुपयांनी खाली आले. जुलै महिन्यातील लिलावांत दहा हजार गोणींपर्यतच आवक होत होती. रविवारी (दि. 3) झालेल्या लिलावात 11 हजार 22 गोणी शेतकरीवर्गाने लिलावात विक्रीस आणल्याची माहिती संचालक नबाजी घाडगे सचिव रुपेश कवडे, कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.
लिलावात प्रतिदहा किलोस मिळालेले भाव
एक्स्ट्रा गोळा : 160 ते 171 रुपये.
सुपर गोळा : 140 ते 160 रुपये.
सुपर मीडीयम : 120 ते 140 रुपये.
गोल्टी/गोल्टा : 100 ते 120 रुपये.
बदला/चिंगळी : 30 ते 80 रुपये.