

पुणे: पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतल्यानंतर जातिवाचक अपमानजनक दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ संबंधित मुलीने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनुसार संभाजीनगर पोलिस पुण्यात दाखल झाले होते. त्यानुसार संबंधित मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.
सासरच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरमधील एक विवाहित तरुणी पुण्यात निघून आली आणि मैत्रिणीच्या साहाय्याने तीन मुलींच्या फ्लॅटवर राहायला आली. दरम्यान, संभाजीनगर येथील तरुणीच्या सासरच्यांनी तिच्या मिसिंगची तक्रार दाखल केली होती. तांत्रिक तपासाआधारे ही तरुणी पुण्यातील कोथरूड परिसरात राहायला आहे, असे समजले. (Latest Pune News)
त्यानुसार तिचा शोध घेत संभाजीनगर येथील पोलिस पुण्यात दाखल झाले आणि ते कोथरूड परिसरात राहणार्या या तीन मुलींच्या घरी गेले. त्या वेळी संभाजीनगर येथील तरुणी कामासाठी बाहेर गेल्याचे त्यांना तिच्या मैत्रिणींनी सांगितले. मात्र, या पोलिसांनी इतर मुलींकडे सगळी चौकशी करायला सुरुवात केली.
हीच चौकशी करताना या तीन मुलींच्या फ्लॅटमध्ये घुसून त्यांचे कपडे चेक केले. सोबतच त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळदेखील केली. जातिवाचक भाषेतदेखील त्यांना प्रश्न विचारले असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.