

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित स्मारक असलेल्या शिवसृष्टी (आंबेगाव बुद्रुक) बाहेरील सूचना फलकावर एकाने लघुशंका केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 31) पहाटे घडली. या कृत्यामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संबंधित दाम्पत्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अमोल अरुण कुलकर्णी (वय 59) आणि त्यांची पत्नी स्नेहा अमोल कुलकर्णी (वय 57, दोघेही रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याबाबत नवनाथ तुकाराम अमराळे (वय 23) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अमोल हे सरकारी सेवेतून निवृत्त झाल्याची माहिती आहे. (Latest Pune News)
फिर्यादी अमराळे हे त्यांच्या मित्रासह नवले ब्रिजहून निघाले होते. ते शिवसृष्टीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून पुढे जात असताना तेथे दोन चारचाकी वाहने उभी असल्याचे त्यांना दिसले. त्यातील एका गाडीशेजारी एक वयोवृद्ध पुरुष थेट सूचना फलकावर लघुशंका करीत होते, तर त्यांच्यासोबत एक महिला शेजारी उभी होती. फिर्यादींनी विचारणा केल्यानंतर संबंधितांनी आपली ओळख सांगितली.
हा सर्व प्रकार फिर्यांदीसोबत असलेल्या एकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांनी अमोल कुलकर्णी यांच्यासह पत्नीला अटक केली.
अमोल हे दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करीत आहेत.
संबंधित दाम्पत्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
- सावळाराम साळगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे.