

आशिष देशमुख
पुणे: पुणे शहरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (एनडीए) हे आजवर मुलांचे मोठे आकर्षण केंद्र होते. मात्र, आता ते मुलींचेही मोठे आकर्षण केंद्र बनले आहे. कारण, पंचाहत्तर वर्षे इथे मुलींना प्रवेश नव्हता.
मात्र, दोन दिवसांपूर्वीच 17 मुलींनी येथून अत्यंत अवघड असे प्रशिक्षण पार करीत अधिकारी पदावर सैन्यदलात प्रवेश केला. त्यामुळे ‘एनडीए’ची क्रेझ वाढली. सध्या तेथे 17 राज्यांतून आलेल्या तब्बल 126 युवती हे अवघड प्रशिक्षण घेत आहेत. या वीरांगणा लवकरच अधिकारी बनून सैन्यात दाखल होणार आहेत. (Latest Pune News)
सर्वोच्च न्यायलयाच्या एका निर्णयाने मुलींसाठी ‘एनडीए’ची कवाडे 2021 मध्ये खुली केली अन् ‘एनडीए’मध्ये मुलींना प्रवेश मिळाला. सन 2022 मध्ये 19 मुलींची निवड झाली. त्या सर्वच जणींनी आपली सर्व प्रकारची क्षमता सिद्ध करून दाखवली. पुरुषांच्या बरोबरीने त्या सैन्यदलात थेट अधिकारी पदावर विराजमान होते आहेत.
शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर कस
मुलींनी पासिंग आउट परेड होताच आपल्या महिला प्रशिक्षकांना साश्रुनयनांनी निरोप दिल; कारण हे प्रशिक्षण अत्यंत अवघड होते. एका मुलीने सांगितले की, मी खूप आजारी होते तरीही मला घरी जाता आले नाही. इथेच सर्व उपचार घेऊन बरे झाले. आमच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतांचा इथे विकास झाला. त्यामुळेच ‘एनडीए’चे प्रशिक्षण खूप वेगळे आहे.
ड्रील, पीटी आणि खेळांत मेरिट कार्ड
तीन वर्षांच्या अथक परिश्रमांत इथे मुलींना भल्या पहाटे 3 वाजताच मुलांच्या बरोबरीने उठावे लागे. उठो जॅग्वॉर... अशी हाळी कॅडेट कॅप्टनने दिली की, सुरुवातीला लाँग रनिंग, लाँग जम्पिंग, अडथळ्यांची शर्यत यासह भले मोठे अवजड टायर ढकलणे, ओढणे, खेचत नेणे असे प्रकार होते. ड्रील, पीटी आणि खेळांत मुलींनी मेरिट कार्ड मिळवले. त्याचे बॅच त्यांच्या पोशाखावर चमकत होते हा नवीन बदल मुलींसाठी ‘एनडीए’ संस्थेने केला.
पगार 80 हजार ते 1 लाख रुपये
मुलांसह मुलींनाही आता 18 ते 19.5 या वयात म्हणजे बारावी परीक्षा देतानाच ही राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा परीक्षा देता येते.
लेखी परीक्षेत पास झालात तर पुढे बौद्धिक, शारीरिक, मानसिक चाचणीतून निवड होते.
1970 मध्ये येथून पास होणार्या अधिकारीवर्गाला केवळ 400 रुपये पगार होता. आता मात्र तो 80 हजार ते 1 लाखापर्यंत गेला आहे.
बारावीत तुम्ही कोणत्याही शाखेत असला तरी ही परीक्षा देता येते. मात्र, इथे आल्यावर बी.ए., बी.एस्सी., बी.टेक. यापैकी एका पदवीची तयारी करावी लागते.
लष्कर, हवाईदल आणि नौदल हे आपल्या आवडीनुसार निवडता येेते.
पदवी अभ्याक्रमासह कठोर प्रशिक्षण, आधुनिक युद्धकला, शस्त्रकला शिकावी लागते.
वरिष्ठ अधिकार्यांचा दबाव आणि अभ्यासाचा ताण यातून तुमचे नेतृत्वगुण, समयसुचकता हे गुण हेरले जातात.
‘एनडीए’मधून मे 2025 मध्ये 339 कॅडेटस्ना पदवी प्रदान झाली. यात 17 मुलींचा समावेश होता.
सध्या तेथे 17 राज्यांतील 126 मुली प्रशिक्षण घेत आहेत. यात हरियाणा (35), उत्तर प्रदेश (28), राजस्थान (13), महाराष्ट्र (11), केरळ (4), कर्नाटक (1) यांचा समावेश आहे.
‘एनडीए’मध्ये मुलींना प्रशिक्षण देणे मोठे आव्हान होेते. कारण, त्यांना पहाटे तीनपासूनची दिनचर्या ही अभ्यासासह सांभाळावी लागणार होती. मुलींचा प्रवेश होताच आम्हाला काही बदल करावे लागले. महिला प्रशिक्षकांच्या साहाय्याने आम्ही हे करू शकलो. यात खेळ, घोडेस्वारी, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण, यासह त्यांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा प्रकारची अवघड चाचणी सतत तीन वर्षे घेण्यात आली.
- अॅडमिरल गुरुचरण सिंग, संचालक, ‘एनडीए’, पुणे