पुणे: गृहोद्योगामार्फत रोजगार देण्याच्या बहाण्याने पुण्यातील 1 हजार 634 महिलांची 42 लाख 79 हजार 700 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी समूहाचे सभासद शुल्क म्हणून प्रत्येक महिलेकडून दोन हजार 50 रुपये घेण्यात आले आहेत.
याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर आणि पत्नी जयश्री हंगरगे-कोळेकर (रा. सुयोग हॉल, भेकराईनगर, हडपसर) या दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडला आहे. याबाबात ज्योती उत्तम बोरावके (वय 52,रा. ससाणेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळेकर दाम्पत्याने भेकराईनगर येथे ‘खुशी महिला गृहोद्योग समूह’ नावाची बनावट गृहोद्योग संस्था सुरू केली. या कंपनीचा पेन्सिल पॅकिंग आणि इतर गृहोपयोगी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले. उद्योगवाढीसाठी फिर्यादी यांच्यासह चार व्यक्तींना वेगवेगळ्या कंपनीच्या शाखांचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले.
त्यानंतर व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आधी महिलांना उद्योग समूहाचे सभासद व्हावे लागेल. त्यासाठी प्रत्येकी 2050 रुपये भरावे लागतील. त्यानंतर प्रत्येक महिलेला 200 रुपये प्रतिदिन असे आठवड्यातील पाच दिवस काम मिळेल, असे आमिष कोळेकर दाम्पत्याने दाखविले.
त्यानंतर कोळेकर दाम्पत्याने शाखाप्रमुख म्हणून नेमणूक झालेल्यांना महिलांकडून गुंतवणूक आणण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी ज्योती बोरावके यांनी तब्बल 300 महिलांकडून सात लाख 15 हजार रुपयांची गुंतवणूक गोळा केली. तसेच इतर शाखाप्रमुखांनी 1 हजार 334 महिलांकडून 35 लाख 64 हजार 700 रुपयांची गुंतवणूक कंपनीसाठी जमविली.
काम मिळण्याच्या अपेक्षेने शाखाप्रमुख आणि 1634 महिलांनी एकूण 42 लाख 79 हजार 700 रुपये कंपनीमध्ये गुंतविले. मात्र, त्यानंतर गुंतवणूक केलेल्या महिलांना कोणतीही नोकरी अथवा मोबदला न देता कोळेकर दाम्पत्याने त्यांची आर्थिक फसवणूक केली.
चौघींची शाखाप्रमुख म्हणून केली होती निवड
तक्रारदार यांच्यासह चौघींची शाखाप्रमुख म्हणून नेमणूक करून त्यांना महिलांकडून गुंतवणूक आणण्यास भाग पाडले. त्यानंतर 42 लाख रुपये घेऊन कोळेकर दाम्पत्य फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गुंतवणूकदार महिलांनी पैशांसाठी अथवा नोकरीसाठी शाखाप्रमुखांकडे तगादा लावला. त्यानंतर बोरावके यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.