

आशिष देशमुख
पुणे: शहरात गत पाच वर्षांत यंदा जुलैचा पाऊस सर्वांत कमी (उणे 60 टक्के) गणला गेला आहे. घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात सतत हलका पाऊस झाला. त्या हलक्या आणि भीज पावसाने पाणी जमिनीत मुरले. त्यामुळे हिरवळ वाढली, पिके तरली तर धरणक्षेत्रातील अतिवृष्टीमुळे शहरातील चारही धरणे भरली.
त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. शहराची जुलैची सरासरी 194 मि. मी.आहे. मात्र, यंदा फक्त 130 मि. मी. पाऊस झाला.तरीही जून आणि जुलै मिळून एकूण पाऊस हा 410 मि. मी. वर गेला. यंदा मान्सून 26 मे रोजीच शहरात आला. (Latest Pune News)
त्यामुळे मे महिन्यातील 17 ते 27 या दहा दिवसांत 280 मि. मी. पाऊस झाला, तर जूनमध्ये सरासरी 156 असताना 270 मि. मी.पाऊस झाला. मात्र, जुलैची सरासरी 190 असताना यंदा केवळ 130 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र, तरीही शहर जून आणि जुलैच्या एकूण सरासरीत पास झाले. सरासरीपेक्षा 48 मि. मी.ज्यादा पावसाची नोंद झाली आहे, तर जिल्ह्याची जुलैची सरासरी 310 आहे. मात्र, 290 मि. मी.पाऊस झाला. जिल्ह्यात जुलैत सुमारे 18 ते 22 टक्के तूट आहे.
हलका, मध्यम आणि मुसळधार
दरवर्षी जुलैमध्ये सर्वाधिक पावसाचा विक्रम शहरात होतो. दरवर्षी शहरात 31 जुलैपर्यंत सरासरी 40 ते 70 मि.मी. पाऊस होतो. मात्र, यंदा पावसाचा जोर फक्त घाटमाथ्यावर जास्त अन् शहर परिसरात खूप कमी होता. त्यामुळे रोजची सरासरी 0.5 ते 20 मि. मी. च्यावर गेली नाही.
यंदाच्या जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस 26 जुलै रोजी 35 मि. मी. झाला तोच सर्वाधिक पाऊस ठरला. त्यापेक्षा मोठा पाऊस यंदा शहरात झाला नाही. यात मुसळधार पाऊस हा 20 ते 35 मि. मी. मध्यम 5 ते 20 मि. मी. तर हलका पाऊस 0.5 ते 5 मि. मी.अशा स्वरूपाचा रोज झाला आहे. यात जुलैच्या 31 दिवसांत 14 दिवस हलका,14 दिवस मध्यम तर फक्त 3 दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे महिनाभरात 130 मि. मी. ची नोंद झाली.
26 जुलै रोजी सर्वाधिक
शहरात जुलैमध्ये फार पाऊस झाला नाही, मात्र रिमझिम पावसाने रोजच हजेरी लावली.26 जुलै रोजी घाटमाथ्यावर अतिमुसळधार तर शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तोच पाऊस यंदाच्या जुलैतील सर्वाधिक ठरला.26 जुलै रोजी शिवाजीनगर (13.1), लोहगाव (22.8), चिंचवड (35), लवळे (26),मगरपट्टा (8.5), कोरेगाव पार्क (7.5) मि. मी. इतका पाऊस झाला.