

आंबेगाव : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणार्या बागल कुटुंबीयांची नियतीने क्रूर थट्टा केली आहे. गर्भवती स्वीटी अक्षय बागल (वय 27) हिचा बिबट्या पाहिल्यानंतर झालेल्या भीतीमुळे आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिच्या मृत्यूपूर्वीच पोटातील बाळानेही या जगाचा निरोप घेतला. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
26 सप्टेंबरच्या रात्री रात्री स्वीटी घराबाहेर गेली असता अचानक तिच्यासमोर बिबट्या आला. भीतीने थरथर कापत ती घरात पळाली. गर्भवती असल्यामुळे अचानक झालेल्या मोठ्या हालचालीमुळे तिचा श्वास लागला आणि रक्तदाब झपाट्याने वाढला. अखेर तिला ससून रुग्णालयात हलवले. मात्र, येथे स्वीटीने अखेरचा श्वास घेतला.