नानगाव: दौंड तालुक्यातील गावागावांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या कुत्र्यांमुळे नागरिक आणि जनावरांना चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत, ज्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असतानाही, ती कमी करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, ज्यामुळे भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
अनेकदा कुत्र्यांच्या भांडणातून किंवा पिसाळल्यामुळे ती नागरिक आणि जनावरांना चावतात. यामुळे रेबीजसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. काही जण इंजेक्शन घेतात, तर काही जण दुर्लक्ष करतात, ज्यामुळे जीव गमवावा लागल्याचेही प्रकार घडले आहेत.
दरम्यान मोकाट कुत्र्यांचे तत्काळ लसीकरण आणि निर्बीजीकरण करावे, ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष पथक (डॉग स्क्वॉड) नेमून कुत्र्यांना सुरक्षितपणे पकडावे, पशुवैद्यकीय विभाग आणि प्राणीमित्र संघटनांनी या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाळीव कुत्रेदेखील लसीकरण न करता मोकाट कुत्र्यांमध्ये मिसळतात. अशावेळी एखादे पिसाळलेले मोकाट कुत्रे पाळीव कुत्र्याला चावल्यास, ते पाळीव कुत्रे घरातील व्यक्तीला चावण्याची शक्यता असते, ज्यामुळे गंभीर घटना घडतात, असे नागरिकांनी सांगितले.
भविष्यातील आव्हान
दिवसेंदिवस वाढत चाललेली मोकाट कुत्र्यांची संख्या ही भविष्यात मोठी समस्या बनू शकते. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर गावोगावी हीच मुख्य समस्या असेल. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.