पुणे: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या संलग्न संस्था आणि उद्योगसमूह यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी ‘शिका व कमवा’ असा उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी संस्था, विद्यार्थी आणि उद्योगसमूह यांना नोंदणी करावी लागणार आहे. यातून विद्यार्थ्यांना थेट उद्योगसमूहांमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचे तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव उमेश नागदेवे यांनी स्पष्ट केले आहे.
नागदेवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने ‘शिका व कमवा’ हा उपक्रम राबविण्याकरिता तयार करण्यात आलेल्या सर्वंकष धोरणास मान्यता दिलेली आहे. या धोरणामध्ये नमूद अटी व शर्तीनुसार संबंधित संस्था व सहभागी उद्योगसमूहांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संबंधित उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘शिका व कमवा’ या उपक्रमांतर्गत संस्थेतील विविध अभ्यासक्रमांसाठी शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. (Latest Pune News)
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अधिनियम 1997 मधील कलम 25 नुसार संबंधित योजनेअंतर्गत संस्थेस संलग्निकरण करण्याची बाब नमूद आहे. ‘शिका व कमवा’ या उपक्रमांतर्गत शासनाची मान्यता प्राप्त झालेल्या सर्व पालक संस्थांनी शासन निर्णयात नमूद सर्व अभ्याक्रमांकरिता, शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता दि. 17 जूनपर्यंत तसेच उद्योगसमुह संस्थांनी दि. 21 जूनपर्यंत मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून संलग्नता शुल्क व कागदपत्रांची पुर्तता करुन संलग्नता घेणे आवश्यक आहे.
तसेच संबंधित उपक्रमात सहभागी होणार्या प्रत्येक उद्योगसमूहासाठी मंडळाकडून स्वतंत्र संलग्नता प्राप्त करून घेणेदेखील अनिवार्य आहे. संलग्नता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लिंक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
‘शिका व कमवा’ या उपक्रमाच्या धोरणामध्ये विद्यार्थी नोंदणी वर्षातून दोन वेळा करण्याची तरतूद आहे. त्यानुसार मंडळाने संबंधित नोंदणी ही प्रत्येक वर्षी जानेवारी व जून महिन्यांमध्ये करण्याचे निश्चित केले आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून पूर्ण करणे गरजेचे असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
असे आहे संलग्नता व विद्यार्थी नोेंदणी वेळापत्रक
संस्थेच्या संलग्नतेकरिता अंतिम मुदत - 17 जून
उद्योगसमूहांच्या संलग्नतेकरिता अंतिम मुदत - 21 जून
विद्यार्थी नोंदणीकरिता अंतिम मुदत (जून 2025 करिता) - 27 जून
विद्यार्थी नोंदणीकरिता अंतिम दिनांक (जानेवारी 2026 करिता) - 15 जानेवारी 2026