पुनीत बालन ग्रुपच्या लघुपटातून उलगडणार आता एनडीएचा इतिहास..

पुनीत बालन ग्रुपच्या लघुपटातून उलगडणार आता एनडीएचा इतिहास..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशाच्या संरक्षणासाठी अतुल्य क्षमता असलेले अधिकारी निर्माण करणार्‍या पुण्यातील 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी'चा (एनडीए) अमृतमहोत्सवी इतिहास ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात उजळणार आहे. 'पुनीत बालन ग्रुप'च्या वतीने 'एनडीए'च्या इतिहासाची माहिती देणार्‍या लघुपटाची (डॉक्युमेंटरी) निर्मिती केली आहे. 'एनडीए'ने 75 वर्षांत पदार्पण केल्याच्या पार्श्वभूमीवर हा लघुपट तयार केला आहे.

देशरक्षणासाठी तिन्ही संरक्षण दलांत सक्षम आणि प्रशिक्षित अधिकार्‍यांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्समधील अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याची गरज भासू लागली, त्या वेळी म्हणजेच 1949 साली 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी'ची (एनडीए) स्थापना करण्यात आली. येथे उच्च शिक्षण आणि लष्करी प्रशिक्षण एकत्र दिले जाते. येथे 18 ते 19 व्या वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अतिशय शिस्त आणि बाहेरच्या जगापासून लांब, मौज-मजेपासून लांब ठेवत या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यावर आधारित हा लघुपट 'पुनीत बालन ग्रुप'च्या वतीने तयार केला आहे.

6 ऑक्टोबर 1949 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खडकवासला परिसरात 'एनडीए'ची पहिली वीट रचली. त्या वेळी हा परिसर घनदाट जंगलाचा होता. तिन्ही सेनांच्या प्रशिक्षणासाठी हा परिसर अतिशय चांगला होता. त्यामुळे या ठिकाणी या अकादमीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. हळूहळू खडकवासलातील जंगलाचे आता शहरात रूपांतर झाले. अशाच बदलत्या काळात 'एनडीए'मध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाते, त्यांना संरक्षण दलाचे अधिकारी कसे बनविले जाते, याची माहिती या लघुपटातून दिली आहे.

'सुदान' ब्लॉक नाव कसे पडले?

'एनडीए'च्या परिसरात आलेल्या अनेकांना नेहमीच प्रश्न पडतो की, 'एनडीए'मधील भारतीय सैन्यदलाच्या इमारतीला दुसर्‍या देशाचे म्हणजेच 'सुदान' असे नाव का ठेवण्यात आले? त्याची देखील माहिती 'पुनीत बालन ग्रुप'च्या वतीने या लघुपटात देण्यात आली आहे.

देशाच्या संरक्षण क्षेत्रात असामान्य योगदान असलेल्या संस्थांपैकी एक संस्था म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए. याच 'एनडीए'चा इतिहास लघुपटाच्या माध्यमातून देशवासीयांसाठी मांडण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. या लघुपटात 'एनडीए'च्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला असून, हा लघुपट सर्वांनाच आवडेल, असा विश्वास आहे.

– पुनीत बालन, अध्यक्ष, 'पुनीत बालन ग्रुप'

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news