वस्तुसंग्रहालयातील पुरावशेषांचे होणार थ्रीडी स्कॅनिंग | पुढारी

वस्तुसंग्रहालयातील पुरावशेषांचे होणार थ्रीडी स्कॅनिंग

आशिष शिंदे

कोल्हापूर : राज्यातील वस्तुसंग्रहालयांमध्ये असलेल्या अनमोल खजिन्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थ्रीडी डॉक्युमेंटेशन होणार आहे. यामुळे जगभरातील अभ्यासकांबरोबरच चाहत्यांना एका क्लिकवर आहे त्या स्वरूपात या पुरातन कलाकृती पाहण्यासाठी उपलब्ध होतील. टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयासह राज्यातील 13 वस्तुसंग्रहालयांतील 2 हजार 250 पुरावशेषांचे थ्रीडी स्कॅनिंग करण्यात येणार आहे. थ्रीडी डॉक्युमेंटेशनमुळे या दुर्मीळ कलाकृतींच्या प्रतिकृती स्मरणिका सहज उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा होईल.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत असताना या दुर्मीळ कालकृतींचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जतन आणि पुढच्या पिढीला त्याविषयी आकर्षण वाटून त्याबाबतची जाणीव तयार व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पुरातत्त्व विभागाअंतर्गत येणार्‍या राज्यातील 13 संग्रहालयांमधील पुरावशेषांचे थ्रीडी स्कॅनिंग करण्यासाठी शासनाने 3 कोटी 8 लाख 75 हजार रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.

थ्रीडी स्कॅनिंग हे अत्याधुनिक डॉक्युमेंटशनासाठी आवश्यक असते. जागतिक पातळीवर संग्रहालयांमध्ये अशा प्रकारे प्राचीन कलाकृतींचे डॉक्युमेंटेशन केले जाते. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या अखत्यारीतील संग्रहालयामधील पुरावशेषांचे थ्रीडी स्कॅनिंग करण्यात येणार आहे. थ्रीडी स्कॅनिंग करताना पुरावशेषांची कोणतीही हानी होणार नाही याची जवाबदारी निविदाकार व पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांची असणार आहे.

Back to top button