पुणे : आता माझी सटकली; अजित पवार पाच कार्यक्रमात सात वेळा डाफरले

पुणे : आता माझी सटकली; अजित पवार पाच कार्यक्रमात सात वेळा डाफरले

Published on

दिगंबर दराडे

पुणे : 'आता माझी सटकली… मला राग येतोय…' या 'सिंघम' चित्रपटातील गाण्याने संपूर्ण तरुणाईला ठेका धरायला लावला होता. आता मात्र गीतातील अभिनेत्यासारखी अवस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झाली आहे. मागील आठवड्यातील पाच कार्यक्रमांमध्ये पवारांनी तब्बल सातवेळा अधिकार्‍यांना फैलावर घेतले. यामुळे आता दादांचीही अवस्था 'आता माझी सटकली… मला राग येतोय…' अशी तर झाली नाही ना, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

अजित पवार त्यांच्या प्रशासकीय कार्यपध्दतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कितीही मोठे अधिकारी असले, तरी अजित पवारांबरोबर काम करताना त्यांची भंबेरी उडते. त्याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या पाच कार्यक्रमांत पाहायला मिळाला. पाच कार्यक्रमांत अजित पवार सरकारी बाबूंवर तब्बल सातवेळा चिडल्याचे दिसून आले. मागील आठवड्यापासून पुणे जिल्ह्यासह राज्यात पवारांकडून उद्घाटनाचे कार्यक्रम सुरू आहेत. दगडापासून ते झाडापर्यंत… लाइटच्या पॉइंटपासून ते विश्रामगृहातील बाथरूममधील पाण्याच्या सोयीपर्यंत अनेक प्रश्न अजित पवारांनी अधिकार्‍यांना विचारले.

निमित्त होते कोयनेतील विश्रामगृहाच्या उद्घाटनाचे. त्या ठिकाणी डबलचे बेड का केलेत? इथपासून ते लाइटचे पॉइंट जास्त का बसवले? असे विविध प्रश्न त्यांनी अधिकार्‍यांना विचारले. पण, एवढेच नाही, तर त्यावर उत्तरही त्यांनीच दिले… 'जादा पॉइंट केले की जादा पैसे भेटत असतील वायरमनला…' शनिवारी-रविवारी बारामतीला असताना बँकेच्या मुद्द्यावरून प्रशासकीय अधिकार्‍यांना त्यांनी धारेवर धरले. 'कोणत्याही बँकेचे उद्घाटन करीत असताना त्याच्या सर्व प्रकारच्या परवानग्या असतील, तरच मला बोलवा. शेवटचे सांगतोय, परत परत असे होता कामा नये. आपण शासनाचा पगार घेतो. त्यासाठी सर्वसामान्य नागरिक टॅक्स भरत असतात. त्यातूनच आपला पगार आणि पेन्शन मिळत असते, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे.'

वास्तू चांगली झाली पाहिजे…

बुलडाणा या ठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त गेलेले असतानादेखील पवार यांनी तेथील अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. पुरातत्व विभागाचे काम करीत असताना नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. वास्तूला हात लावताच कामे झाली पाहिजेत. चांगली फरशी वापरली पाहिजे. भले त्यासाठी राजस्थानला जा; मात्र वास्तू चांगली झाली पाहिजे.

अजित पवार उवाच…

  • तुम्ही तर नरकातच जाणार
  • लोकांच्या टॅक्समधून तुमचा पगार होतो
  • पुन्हा सांगायला लावू नका
  • अरे बेड… डबल करायचे की
  • अरे बापरे.. पॉइंट वाढविले की 'बिल' वाढते
  • शेवटचे सांगतोय…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news