आता बार, रेस्टॉरंट रात्री दीडपर्यंत राहणार खुले

आता बार, रेस्टॉरंट रात्री दीडपर्यंत राहणार खुले
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बार, रूफ टॉप हॉटेल आणि पबसोबतच रेस्टॉरंटही सर्व नियमांचे पालन करीत मध्यरात्री दीडपर्यंत सुरू राहतील. पोलिसांकडून या रेस्टॉरंटना अकरा वाजता बंद करण्यासाठी तगादा लावण्यात येणार नाही, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी स्पष्ट केले. तसेच, रेस्टॉरंट, बार, पबसाठी सुधारित नियमावली आणि आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. सदर नियमावली प्रायोगिक तत्त्वावर पंधरा दिवसांसाठी लागू करण्यात आली. त्यावरून कलम 144 नुसार जमावबंदीचा आदेशही काढला होता.

त्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. दरम्यान, त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालयात हॉटेल आणि बारचालकांची बैठक आयोजित करण्यात आली. 125 हॉटेलचे मालक, प्रतिनिधी उपस्थित होते. बार, पब दीड वाजेपर्यंत सुरू राहत असले, तरीही रेस्टॉरंट मात्र रात्री 11 वाजता बंद करण्यासाठी पोलिस आग्रही असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. त्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंटचालकांना नाहक त्रास देण्यात येऊ नये, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

पोलिसांचा अनावश्यक त्रास टळणार

बार किंवा पबसाठी मध्यरात्री दीडपर्यंतची मुदत यापूर्वीच होती. तसेच, दीड वाजता संबंधित आस्थापना बंद झाल्यानंतर ग्राहक-कर्मचार्‍यांना आवरा-आवर करून बाहेर येण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, अर्ध्या तासाचा वेळ वाढीव देण्यात आला आहे. या वेळेच्या मर्यादेत पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही. त्यानंतरही कोणी बार, पब सुरू ठेवत असेल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

हॉटेल, बार किंवा पबचालकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय करावा, त्यात शिस्त असावी, हा आमचा हेतू आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संबंधित आस्थापनांना विनाकारण कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना दिल्या आहेत.

– अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

काय म्हणाले पोलिस आयुक्त..

  •  रूफ टॉप हॉटेलमध्ये दहा वाजता साऊंड सिस्टीम बंद करावी लागेल.
  • रूफ टॉप हॉटेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या हॉटेलला दारू विक्रीचा परवाना नसल्यास कारवाई होणार.
  • हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री करणार्‍यांविरोधात कारवाईसाठी मोहीम राबविणार.
  • मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर किंवा परिसरात रस्त्यावर दारू पिणार्‍यांसह त्यास प्रोत्साहन देणार्‍यांवर कारवाई करणार.
  •  ऑनलाईन मद्यविक्री पोलिसांच्या रडावर
  •  मनोरंजनासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, पबमध्ये आलेल्या ग्राहकांना त्रास नको
  •  अपवादात्मक परिस्थिती सोडता, पोलिस सतत आस्थापनामध्ये प्रवेश करणार नाहीत.
  •  नियमभंग केल्याची कारवाई करायचे झाल्यास पोलिस मॅनेजरला बाहेर बोलावून घेतील. दीड वाजताची आस्थापना बंद करण्याची वेळ झाल्यानंतर करवाई करतील.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news