

Man survives pole jump
खेड : घरातील मानसिक त्रासामुळे जीवन संपवण्याच्या उद्देशाने विद्युत खांबावर चढलेला तरुण खेड सिटीमधील ग्रामस्थ तसेच पोलिसांच्या मदतीने सुखरूप मिळाला. ही घटना मंगळवारी (दि. ६) खेड सिटीत निमगावच्या हद्दीत घडली.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, निमगाव येथे खेड सिटी भागात एक २२ वर्षीय तरुण घरातील मानसिक ताणामुळे जीवन संपवण्याच्या उद्देशाने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अमुल डेअरीच्या परिसरातील विद्युत वाहक खांबावर चढला. सुमारे दोन तास तो वर बसून होता. विद्युत प्रवाह सुरू होता.
स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी खांबावरील विद्युत प्रवाह तातडीने बंद केला. पोलिसांना कळवण्यात आले. या तरुणाला खाली येण्याची विनवणी पोलिस व नागरिक करत होते; मात्र तो खाली येत नव्हता. तुम्ही जर वर आले, तर मी उडी टाकीन, अशी धमकी तो वारंवार देत होता.
पोलिस हवालदार मोहन अवघडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी वीजवाहक खांबाखाली जाळी धरुन ठेवली होती. जीवन संपवण्याच्या उद्देशाने उडी मारताना तो जाळीत पडल्यामुळे त्याचा जीव वाचला.