पार्सल विभागात स्कॅनर, सीसीटीव्ही नाही : पुणे रेल्वे प्रशासनाची अनास्था

पार्सल विभागात स्कॅनर, सीसीटीव्ही नाही : पुणे रेल्वे प्रशासनाची अनास्था

पुणे : अप्रिय घटना व प्राणहानी टाळण्यासाठी आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमरे असणे आवश्यक आहे. मात्र, अतिशय संवेदनशील ठिकाण असलेल्या पुणे रेल्वेच्या पार्सल विभागात एकही कॅमेरा नाही. तपासणीसाठी आवश्यक असलेले स्कॅनर मशिनसुद्धा उपलब्ध करून दिलेले नाही. सुरक्षिततेतील त्रुटी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून हजारो प्रवाशांच्या प्रवासासह मालवाहतूकदेखील करण्यात येत आहे. येथून दुचाकी वाहनांसह अन्य मालाची पॅकिंगद्वारे वाहतूक केली जाते. मात्र, या ठिकाणी येणार्‍या-जाणार्‍या मालातून नक्की कशाची वाहतूक केली जाते, याची बाहेर कसलीही माहिती होत नसल्याचे दै. 'पुढारी'ने बुधवारी (दि. 3) केलेल्या पाहणीत समोर आले आहे. इथे पार्सल तपासणीसाठी आवश्यक असलेले स्कॅनर मशिनसुद्धा उपलब्ध नसून, येथून पार्सलमधून काय वाहतूक होत आहे, याबाबत प्रवाशांना प्रश्न पडत आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसंदर्भात काय कार्यवाही केली जाते, याची दैनिक 'पुढारी'कडून प्रतिनिधीच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली. या वेळी पार्सल विभागातील इनवर्डसह अन्य अंतर्गत भागात सीसीटीव्ही नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येथे चाललेल्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

पार्सल विभागात कॅमेरे असणे, हे गरजेचे आहे. कॅमेरे न बसवून रेल्वे येथे होणारे गैरप्रकार लपवू पाहत आहे आणि स्थानकात ज्या ठिकाणी कॅमेरे आहेत. त्या ठिकाणी बसवलेले कॅमेरे हलक्या दर्जाचे आहेत. त्यामुळे तातडीने रेल्वे स्थानकावर व पार्सल विभागात प्रत्येक ठिकाणी नवीन आणि उत्तम दर्जाचे कॅमेरे तातडीने बसवावेत.

– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

पुणे रेल्वे स्थानक 'आओ जाओ घर तुम्हारा' बनले आहे. स्थानकात पार्सल विभागासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे नाहीत. त्या ठिकाणी कॅमेरे बसवले जावेत, यासाठी वर्षभरापासून आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, रेल्वेचे पुण्यातील वरिष्ठ अधिकारी आम्हाला दाद देत नाहीत. रेल्वे स्थानकावर लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवावेत, अन्यथा आम्ही जनआंदोलन करू.

– अनिल परदेशी, सामाजिक कार्यकर्ते, पुणे स्टेशन

पुणे रेल्वे स्थानकावर नवीन सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. त्याचे टेंडर खुले करण्यात आले आहे. लवकरात लवकर स्थानकावरील जुने खराब सीसीटीव्ही बदलून नवीन सीसीटीव्ही बसवण्यात येतील.

– इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news