राहुल गांधी यांच्याकडे 20 कोटींची संपत्ती! | पुढारी

राहुल गांधी यांच्याकडे 20 कोटींची संपत्ती!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 20.4 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम संपत्ती असून, मागील पाच वर्षांत त्यामध्ये 28 टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल यांच्याकडे स्वतःचे घर आणि वाहन नसून आपल्याविरोधात 20 खटलेही प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांच्याकडे एकूण 9.24 कोटींची जंगम आणि 11.14 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील आयकर विवरणानुसार या कालावधीत त्यांनी एक कोटीहून अधिक रुपयांची कमाई केली. हा आकडा मागील चार आर्थिक वर्षांच्या तुलनेत कमी असून मागील पाच वर्षांच्या आयकर विवरणानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे स्पष्ट होते. इक्विटी शेअर, म्युच्युअल फंड, सुवर्ण रोखे, पीपीएफ, शेअर्समध्येही त्यांनी मोठी गुंतवणूक केल्याचे प्रतिज्ञापत्रातील माहितीवरून स्पष्ट होते. दरम्यान, आपल्याकडे घर आणि वाहन नसल्याची माहिती त्यांनी दिली असली तरी त्यांच्या नावे गुरुग्राममध्ये दोन व्यवसायिक इमारतींची नोंद आहे. त्यांचे मूल्य नऊ कोटींच्या आसपास असून दिल्लीतील मेहरौलीत त्यांची वडिलोपार्जित जमीनही आहे.

Back to top button