

पुणे: ‘‘आपल्या देशात आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मंत्र्याच्या पोटातून मंत्री तयार होत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. तसेच राजकीय पक्षांत जातींचे सेल केले जातात ते काहीही उपयोगाचे नाहीत,” अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या षट्यब्दीपूर्ती निमित्ताने संस्थेतर्फे गणेश कला क्रीडा केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मंत्री गडकरी यांनी ऑनलाइन संवाद साधत नहार यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच त्यांनी राजकीय परिवारवाद अन् घराणेशाहीवर टीका तर समाजिक कार्य करणारांची प्रशंसा केली.
काय म्हणाले गडकरी
आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मंत्र्याच्या पोटातून मंत्री. आता ही प्रथा बंद व्हावी.
याचा अर्थ कोणाचा मुलगा असणं गुन्हा नाहीये. पण समाजसुधारकाच्या जीवनातून देखील समाजसुधारक तयार झाले पाहिजेत.
ते त्याच्या आई-वडिलांच्या पुण्याईवर नाही, तर स्वकर्तृत्वाने ते चमकले पाहिजेत.
बाबा आमटे थोर होते, तेवढंच काम विकास व प्रकाश आमटेंनी केलं आहे.
कश्मीर येथील आतंकवादाच्या लढाईमध्ये जे लोक मृत्युमुखी पडले, त्यांच्या परिवारामध्ये जाऊन त्यांच्या मुलाबाळांना पाठबळ देण्याचं काम ‘सरहद’ संस्थेने केलं.
अशा प्रकारचं काम आपल्यालाकुठेच फारस दिसत नाही. कश्मीर खोऱ्यात शांतता नांदण्यात संजय नहार यांचा मोलाचा हातभार आहे.
प्रत्येक राजकारणी आपल्या पुढील निवडणुकीचा विचार करतो, या उलट प्रत्येक सामाजिक-आर्थिक सुधारक शतकानुशतकांचा विचार करतो.
तुम्ही जर उत्तम सामाजिक काम केलं तर तुम्हाला पोस्टर लावायची गरज नाही. कटआऊट लावायची गरज नाही. तुम्हाला लोकांकडे जाऊन मतं मागण्याची गरज नाही.
जातींचे सेल करून उपयोग नाही
जात, पंथ, धर्म, भाषेचा हा बागुलबुवा राजकारणामध्ये करतो. तो काही कामाचा नाही. मी पण पक्षाचा अध्यक्ष होतो. अनेक जातींचे सेल तयार केले. ज्या गोष्टी करायच्या त्या करून बघितल्या कारण निवडणूक जिंकायची म्हणून केलं पाहिजे. पण नंतर माझ्या उशिरा, बऱ्याच उशिरा लक्षात आलं की हे सगळं तकलादू आहे.