निर्भय बनो सभा : निखिल वागळे हल्लाप्रकरणी गुन्हे दाखल

निर्भय बनो सभा : निखिल वागळे हल्लाप्रकरणी गुन्हे दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर शुक्रवारी पुण्यात हल्ला झाला होता. 'निर्भय बनो' सभेला जात असताना वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. एका गुन्ह्यात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 200 ते 250 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे नेते-कार्यकर्ते तसेच निखिल वागळे यांच्यासह 'निर्भय बनो' सभेच्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, निखिल वागळे यांची गाडी फोडणार्‍या दहा जणांवर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

सभेला होणारा विरोध लक्षात घेता पोलिसांनी सभेच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश काढला होता, तरी देखील हे सर्व त्या ठिकाणी जमा झाले होते. त्यामुळे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भाजपसह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षकार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, कार्यक्रमस्थळी येत असताना निखिल वागळेंच्या गाडीची तोडफोड झाली. अंगावर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला तसेच गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी रात्री शहरातील वातावरणात तणाव निर्माण झाला होता. वागळेंना पोलिसांनी सभा न घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पण, वागळे सभा घेण्यावर ठाम होते. हल्ला झाल्यानंतर निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांनी राष्ट्रसेवा दलाच्या कार्यलयात सभा घेतली. निखिल वागळे यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट केली होती. यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यातून त्यांनी वागळेंच्या 'निर्भय बनो' सभेला विरोध दर्शविला होता. सभा आयोजित केल्यास ती उधळून लावण्यात येईल, असा इशारा भाजपकडून देण्यात आला होता. मात्र, निखिल वागळे सभा घेण्यावर ठाम होते. सभेच्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला होता.

पाहा याबाबत पुणे पोलिस काय म्हणतात…

पुणे पोलिसांनी याबाबत प्रेसनोट काढली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, निखिल वागळे यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने पुण्यातील वातावरण तापले होते. वागळे पुण्यात पोहचल्यानंतर पोलिस अधिकार्‍यांनी त्यांची भेट घेऊन सभेच्या ठिकाणच्या आदोलकांनी गर्दी केली असून, त्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असून, सभेच्या ठिकाणची गर्दी कमी होत नाही तोपर्यंत वागळेंनी जाऊ नये, असे सांगण्यात आले. तरीही त्यांनी सभास्थळी जाण्याचा आग्रह धरला. वागळे पोलिसांनी दिलेला सल्ला धुडकावत सभास्थळी निघाले. या वेळी साध्या वेशातील पोलिस त्यांच्या सुरक्षितेसाठी पाठीमागच्या गाडीत होते.

मात्र, मोठ्या प्रमाणात आंदोलक आणि वाहने असल्याने त्यांना त्यांची गाडी अथवा त्यांना लवकर तेथून हलविता आले नाही.
याप्रकरणी दंगल, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेची कारवाई करण्यात येत आहे. तसेच पुणे पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे. पोलिस शिपाई अनिरुद्ध आणेराव यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून दुसरा गुन्हा दाखल केला आहे. त्यात नंदकुमार गजानन नागे (रा. ठाणे), उत्पल चंदावार, संतोष पाटोळे, अरविंद शिंदे, संजय मोरे, निखिल वागळे, धीरज घाटे, प्रमोद कोंद्रे, राहुल सुर्वे, योगेश शांडील्ले, अनिरुद्ध कोकणे, आप्पासाहेब घनवट, अमर हिंगमिरे, आशिष कांटे, ओंकार केदारी, सचिकेत टिकम, राजेश येनपुरे, पुष्कर तुळजापूरकर, सुरज दुर्वे, सनी पवार, भारत निजामपूरकर, योगेश संबळ, आबा शिळीमकर, सुरेंद्र ठाकूर तसेच 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यात 'निर्भय बनो' सभेला परवानगी नाकारली असतानाही सभा घेतल्याने आयोजक नंदकुमार नागे, उत्पल चंदावार व संतोष पाटोळे यांना दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. त्याचबरोबर जमावबंदी असताना आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही आंदोलन केल्याबद्दल भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट यांच्यावर तसेच काँग्रेस व इतर संघटनांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, परवानगी नसताना आंदोलन केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकर्तीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

श्रद्धा वसंत जाधव (वय 21, रा. मुंढवा) या कार्यकर्तीने पर्वती पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी निखिल वागळे यांची गाडी फोडणार्‍या भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पर्वती पोलिसांनी व्हिडीओ पाहून आतापर्यंत 10 जणांना निष्पन्न केले आहे. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. दीपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, स्वप्निल नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर, राहुल पायगुडे यांचा समावेश आहे.

याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे पर्वती पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. निखिल वागळे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी एक गुन्हा, तर पोलिसांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये 'निर्भय बनो' सभेचे आयोजक, भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. काही संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news