

सांगवी : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले. शुक्रवारी (दि. 30) सकाळी त्यांचा सावडण्याचा विधी झाल्यानंतर लागलीच दुपारी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी निरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली.
वास्तविक, दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यासह महाराष्ट्रात शोक व्यक्त होत आहे. मात्र, शुक्रवारी सकाळीच अजितदादा पवार यांचा सावडण्याचा विधी आटोपून दुपारी शरद पवार प्रदूषणाच्या ज्वलंत प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या मदतीला धावले.
बारामती व फलटण तालुक्याच्या सीमेवरून निरा नदी वाहते. या नदीच्या पाण्यात विविध प्रकल्पांचे रसायनमिश्रित सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता थेट ओढ्यात सोडले जाते. हेच सांडपाणी निरा नदीच्या पाण्यात मिसळून दूषित होते. बारामती तालुक्यातील शिरवली व निरावागज येथील बंधाऱ्यांत मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. या दूषित पाण्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना व शेतीला मोठा धोका निर्माण झाला आहे. या दोन्ही बंधाऱ्यांतील जलचर प्राणीसुद्धा मृत झाले आहेत. पाण्याला उग््रा वास येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे.
निरा नदीच्या पाण्यात फलटण तालुक्यातील काही दूध प्रकल्प, साखर कारखाना, फलटण नगरपरिषद, जनावरांचा कत्तलखाना आदीचे रसायनमिश्रित सांडपाणी मिसळते. शिरवली येथील बंधाऱ्यात हे पाणी मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. हेच प्रदूषित पाणी शिरवली बंधाऱ्याच्या दरपांतून होणाऱ्या गळतीमुळे निरावागज बंधाऱ्यातील पाण्यात मिसळून प्रदूषण होत आहे. तसेच निरावागज बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात माळेगाव कारखाना व नगरपंचायतीच्या सांडपाण्याची भर पडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माळेगाव कारखान्याचे संचालक अविनाश देवकाते, माजी संचालक मदनराव देवकाते, दूध संघाचे माजी संचालक चंदरराव देवकाते, शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त गणपत देवकाते, सागर देवकाते यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.