

दिवे: दिवे परिसरात यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र, नंतरच्या काळात पावसाचे प्रमाण कमी होते. सध्या दिवे गावच्या बाजूच्या ओढ्यातील पाणीसाठा काही प्रमाणात टिकून आहे. मात्र, डोंगरालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरात पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
चिंचावले, दरा भागात अंजीर लागवड मोठ्या प्रमाणात आहे. अंजिराचा खट्टा हंगाम संपला असून, मिठ्ठा हंगाम सुरू झाला आहे. परंतु अंजीर उत्पादकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पाणीटंचाईमुळे अंजीर फळांची गळती होत आहे. या परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायात काहिशी वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे दुग्ध व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहे. पाणीच नाही, तर चालू पिकांना पाणी द्यायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी या भागात सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
आम्ही अगोदर पैसे भरण्यास तयार असून, आम्हाला पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडावे, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे.