

बारामती: निरा-बारामती राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असले, तरी कामामध्ये सुरक्षेच्या नियमांचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. रस्त्यावर नियमित पाणी मारले जात नसल्याने धुळीचे प्रचंड लोट उडत आहेत. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मिलिभगतीमुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक, रात्री परावर्तीत होणारे सिग्नल किंवा सुरक्षा बॅरिकेड्स नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. श्वसनाचे त्रास वाढत असल्याच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, या चौपदरीकरणासाठी अनेक मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने पालखीमार्गावरील सावली नाहीशी झाली आहे. संत सोपानदेव पालखी सोहळा दरवर्षी या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो. मात्र, यंदा वारकऱ्यांना उन्हात आणि धुळीच्या वातावरणात प्रवास करावा लागणार आहे.
पूर्वी या मार्गावर वड, पिंपळ, जांभूळ आणि लिंब यांसारखी मोठी व सावली देणारी झाडे होती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कामांमुळे संपूर्ण मार्ग उजाड आणि भकास झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून वृक्षारोपण करण्यात आले असले,
तरी योग्य देखभालीअभावी अनेक रोपे वाळून गेली आहेत. वाहनचालक आणि नागरिकांनी प्रशासनाने तातडीने रस्त्यावर नियमित पाणी मारणे, सुरक्षेची उपाययोजना करणे, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे, अशी मागणी केली आहे.