

पुणे: नेपाळमध्ये राहणाऱ्या भावाची आठवण येत असल्याने त्याला भेटण्याचा हट्ट एका नऊ वर्षांच्या चिमुरडीच्या मनात घर करून बसला. त्या ओढीपोटी ती गुरुवारी सकाळी कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडली आणि चालतचालत थेट स्वारगेटपर्यंत पोहचली. इकडे लेक घरी न परतल्याने आई-वडिलांचा जीव टांगणीला लागला होता. डोळ्यांत अश्रू आणि मनात भीती घेऊन ते तिचा शोध घेत होते. अखेर वानवडी पोलिसांनी अवघ्या तासाभरात चिमुरडीचा शोध लावून तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
प्रथमा सोसायटी परिसरात राहणारे हे नेपाळी कुटुंब उदरनिर्वाहासाठी पुण्यात वास्तव्यास आहे. आई घरकाम करून संसाराला हातभार लावते, तर वडील मजुरीची कामे करतात. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची मुलगी खेळण्यासाठी बाहेर गेली. मात्र, वेळ उलटत गेला, तरी ती घरी परतली नाही.
कामावरून घरी आल्यानंतर आई-वडिलांनी परिसरात तिचा शोध सुरू केला. शेजारी, मित्रमंडळी, ओळखीच्या ठिकाणी चौकशी केली; पण मुलीचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर सायंकाळी त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश महाडीक, सय्यय्क पोलिस निरीक्षक श्रीकांत चव्हाण, अंमलदार दया शेगर, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, गोपाळ मदने यांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली.
२५० सीसीटीव्ही फुटेज तपासत चिमुरडीला शोधले
पोलिसांनी माहिती सर्वत्र प्रसारित केली. स्वतंत्र पथके तयार करून परिसरात शोध सुरू केला. सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या तपासात चिमुरडी स्वारगेटच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. वानवडी पोलिसांनी तत्काळ विविध पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला.
काही वेळातच स्वारगेट परिसरात घाबरलेल्या अवस्थेत फिरत असलेली चिमुरडी आढळून आली. पोलिसांनी तिला सुरक्षित ताब्यात घेतले. मुलगी सापडल्याची माहिती मिळताच तिचे आई-वडील पोलिस ठाण्यात पोहचले. समोर लेकीला सुखरूप पाहताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. भावाच्या आठवणीत ती घराबाहेर पडल्याचे तिने त्यांना सांगितले. आईने तिला घट्ट मिठी मारली. वानवडी पोलिसांच्या तत्परतेमुळे एका कुटुंबाचे हरवलेले हास्य पुन्हा परतले.