Mulshi News: 112 वर अपहरणाची माहिती; निघाली प्रेमकहाणी; महिलेची प्रियकरासोबत जाण्याच्या घाईमुळे उडाली खळबळ

प्रियकरासोबत जाण्याच्या घाईत उडाली खळबळ; बालक महिलेच्या ताब्यात
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

पौड: मुळशी तालुक्यातील पौड पोलिस ठाण्याला ११२ क्रमांकावरून ६ ते ७ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याला दोन दुचाकींवरून नेले जात असल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली.

पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबविली असता, एका महिलेने प्रियकरासोबत दुचाकीवर प्रवास करण्यासाठी आपल्या मुलाला दुसऱ्या दुचाकीवर बसविल्याचे समोर आले. त्यामुळे निर्माण झालेला अपहरणाचा संशय गैरसमजातून असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरे येथील नदीपुलाजवळील टपरीवर थांबलेल्या काही नागरिकांना तीन पुरुष व एक महिला एका लहान मुलाला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून घेऊन जात असल्याचा संशय आला. त्यांनी तत्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर ही माहिती पौड पोलिस ठाण्याला देण्यात आली.

Crime News
Purandar Illegal Businesses: पुरंदरला अवैध व्यवसायांचा विळखा;जुगार, मटका, दारू-ताडी विक्री, खासगी सावकारकीचा तिढा

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक गिरीगोसावी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तीन पथके तयार केली. तसेच, घोटावडे फाटा ते मुठा परिसरातील पोलिस पाटील यांनाही संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या मार्गावर नाकाबंदी करून दोन्ही दुचाकींचे क्रमांक सर्व पथकांना देण्यात आले.

शोधमोहीमेदरम्यान संबंधित दोन्ही दुचाकी पोलिसांना आढळून आल्या. चौकशीअंती संबंधित महिला तिच्या प्रियकरासोबत खारवडे येथे देवदर्शनासाठी जात असल्याचे समोर आले. ती प्रियकराच्या दुचाकीवर बसली होती, तर तिच्या मुलाला सोबत असलेल्या दुसऱ्या दुचाकीवर बसविण्यात आले होते.

Crime News
Swabhimani Morcha: ‘स्वाभिमानी’चा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुलाला जबरदस्तीने बसविल्याचा भास झाल्याने अपहरणाचा संशय निर्माण झाला होता.या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलिस हवालदार अनिता रवळेकर, चंद्रकांत सोनवणे,राजेश गायकवाड, गणेश पवार तसेच विविध गावांतील पोलिस पाटील सहभागी झाले होते.

या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे अपहरण झालेले नाही. गैरसमजातून ही घटना घडली होती. चौकशी करून मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले असून, संबंधितांचे जबाब नोंदवून वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांना सोडून देण्यात आले आहे.

- संतोष गिरीगोसावी, पोलिस निरीक्षक, पौड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news