

निमोणे : शिरूर तालुक्यातील निमोणे-गुणाट शीव रस्ता दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमित केल्यामुळे तब्बल 26 वर्षे बंद होता. रस्त्यासाठी पोलिस ठाण्यापासून जिल्हा न्यायालयापर्यंत उभा वाद करणारे वादी आणि प्रतिवादी या दोघांचेही समुपदेशन करून निमोणे मंडल अधिकारी नंदकुमार खरात यांनी अखेर त्यांचे मनोमिलन घडवून आणले आणि तब्बल 26 वर्षांपासून बंद असलेला रस्ता खुला झाला.
निमोणे परिसर हा पूर्वी कोरडवाहू होता. रब्बी आणि खरीप हंगामात कोरडवाहू शेतात जी पिके घेता येतील तेवढे झाल्यानंतर शेत शिवार हा मोकळाच राहात होता. त्यामुळे रस्त्याची कधीही अडचण निर्माण होत नव्हती; मात्र याच काळात एकाच भावकीतील जवळच्या लोकांनी आपापसातील गैरसमजामुळे शीव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आणि तो रस्ताच संपुष्टात आला.
त्याच दरम्यान या परिसरात चासकमान धरणाचे पाणी फिरलं, बागायत क्षेत्र वाढलं; मात्र रस्त्याचा प्रश्न अतिशय जटील झाला. सुरुवातीच्या काळात शिरूर तहसीलमार्फत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 25 वर्षांत जवळजवळ 9 ते 10 तहसीलदार प्रत्यक्ष या शिवारात आले. समन्वयाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रत्येक वेळी कधी वरिष्ठांकडे तर कधी न्यायालयात हा प्रश्न गेल्यामुळे मार्ग निघणे अवघड होऊन बसले होते.
दरम्यान शीव-पाणंद रस्ते खुले करण्याचे शासनाचे धोरण असल्यामुळे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी स्थानिक मंडलाधिकारी नंदकुमार खरात यांच्यावर हा रस्ता खुला करण्याची जबाबदारी दिली. दोन्ही बाजूंना वाद करण्यापेक्षा व्यवहारी तोडगा काढण्यावर भर द्या, अशा पद्धतीचे समुपदेशन करून मंडलाधिकारी खरात यांनी या शिवारातील शेतकऱ्यांना रस्त्याची गरज व तो तुम्हीच वापरणार आहे याची जाणीव करून दिली. शुक्रवारी (दि. 21) दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सहमतीने या रस्त्याच्या हद्दी निश्चित करण्यात आल्या व सोमवारी (दि. 24) हा शीव रस्ता प्रत्यक्ष 3 हजार फूट खुला करण्यात आला.
या वेळी शिरूरचे पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, मंडलाधिकारी नंदकुमार खरात, ग्राममहसूल अधिकारी राजू बडे, हर्षद साबळे, भूकरमापक बढे, ग्रामसेवक बाळासाहेब शेळके, पोलिस पाटील इंदिरा जाधव, हनुमंत सोनवणे, कोतवाल बाळासाहेब बुलाखे, नानासाहेब काळे, संतोष काळे व दोन्ही बाजूचे शेतकरी उपस्थित होते.