

बारामती : शहर तसेच ग्रामीण भागात सध्या लग्नसराईचा धुमधडाका सुरू असून वातावरणात उत्साहाची लाट आहे. मात्र या जल्लोषाच्या नादात डीजेच्या कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण तीव होत असून नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.
अनेक लग्नसमारंभांत रात्री उशिरापर्यंत जोरात स्पीकर व डीजे वाजविले जात आहेत. याशिवाय फटाके फोडले जात आहेत. ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या या आवाजाचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना होत आहे. अचानक वाढणारा आवाज, घराच्या भिंती हादरवणारे ’बेस’ आणि सततचा गोंगाट यामुळे विश्रांती आणि आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी स्पष्ट नियम केले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून अनेक लग्नसमारंभांत मनमानी सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागातील समारंभ स्थळांवर स्पीकरच्या ’भिंती’ उभारल्या जात असून ध्वनिपातळीचे कोणतेही पालन होत नाही. दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाईचा अभाव असल्याने डीजे वापरणाऱ्यांवर कायद्याचा धाक राहिला नाही. लग्नसोहळ्यांचा आनंद जपताना ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. लग्नाचा हंगाम सुरू असला तरी आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण आवश्यक असल्याचे सांगत, डीजेच्या कर्कश आवाजावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
लग्नसमारंभापूर्वी पायापडणी समारंभाची आता भर पडली आहे. वर आणि वधू दोन्ही बाजूकडून स्वतंत्रपणे त्यांच्या-त्यांच्या गावामध्ये डीजे लावत मिरवणुका काढल्या जात आहेत. त्यासाठी डीजे, घोडा, लेझर शो यावर मोठा खर्च केला जात आहे. या वेळी वापरल्या जात असलेल्या लाईटसमुळे अनेकांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. डीजेचा धडाका अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.