तरुणाई बेभान! आयटीनगरीत नाईट लाईफ जोरात

तरुणाई बेभान! आयटीनगरीत नाईट लाईफ जोरात
Published on: 
Updated on: 

हिंजवडी : मद्य आणि संगीताच्या धुंदीत रात्री-अपरात्री सुरू असलेल्या तरुणाईला अलीकडच्या काळात पब आणि बारचा आसरा मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयटीनगरी हिंजवडी परिसरात असलेल्या काही गावांत आणि महापालिकेच्या हद्दीतील पबकडे तरुणाई ओढली जात आहे. प्रामुख्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवार यासाठी मोठी सोय आयोजक करीत असतात. त्यासाठी काही पबमध्ये मुलींना प्रवेशदेखील मोफत ठेवून आकर्षित केले जात असल्याचे दिसत आहे.

काही बार आणि पब तर पहाटे चारपर्यंत सुविधा देतात. यात पुणे-बंगळुरू रस्त्यावरील बार, माण येथील बार यांचादेखील समावेश आहे. हद्दीच्या वादात कारवाईकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ नये याकडे पोलिस प्रशासन आता तरी लक्ष देईल का? हा प्रश्न आहे. तसेच, अनधिकृत हॉटेल, बार आणि पबवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हिंजवडी परिसरात 63 पब, बार

पुण्यातील अपघातानंतरदेखील या कल्चरवर फारसा परिणाम होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. प्रामुख्याने हिंजवडी येथील मुख्य रस्त्यावरील असलेली डिस्को, पब यावर कारवाई कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे आयटीनगरीमध्ये प्रामुख्याने हिंजवडी-वाकड रस्त्यालगत असलेल्या पब-बार आणि रुफटॉफ बार यांच्या संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आयटीनगरी परिसरात लहान-मोठे सुमारे 63 पब, बार आहेत. रात्री-अपरात्री होत असलेला धिंगाणा आता काही प्रमाणात कमी झाला असला तरीही 'कुछ दिनों की बात हैं' म्हणत हे प्रकार पुन्हा सुरू होणार, यात शंका नाही.

मद्यपींची ग्रामस्थांशी हुज्जत

दारू पिल्यानंतर अनेक तरुण स्थानिक ग्रामस्थांशी हुज्जत घालतात. हाणामारी करतात. छेडछाडीच्या घटनादेखील घडल्या आहेत. या सर्वांना आवरणार तरी कोण? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. वाकड-हिंजवडी रस्त्यावर एक से बढकर एक पब्सची जणू चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे. अनेक कमर्शिअल कॉम्प्लेक्स व मॉलमध्ये अनेकांनी सर्रास पब थाटले आहेत. हिंजवडी-माण रस्त्यावर दुतर्फा, बापूजीबुवा मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावरील डोंगरात व बावधन परिसरात अनेक हिल साइड क्लब 24 तास सुरू असतात. नांदे-म्हाळुंगे रस्ता, मेगा पोलिस कॉर्नर आणि फेज दोन विप्रो सर्कलसमोर रात्रभर तरुण-तरुणींचा मोठा घोळका असतो.

पोलिसांचे दुर्लक्ष

रात्रभर सुरू असणारे बार, हॉटेल्स, पब यासह अनेक अवैध धंद्यांची रेलचेल, तरुण-तरुणींचा मध्यरात्रीचा धांगडधिंगा यामुळे हिंजवडीलगतच्या गावांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. एरवी दिवसभर यंत्रांप्रमाणे धावणारा हिंजवडीचा आयटी परिसर मध्यरात्री बारानंतर पुन्हा जागा होऊ लागतो. परिसरातील अनेक चौक, रस्ते, डोंगरालगतचे बार, पब्स हे झिंगलेल्या तरुण-तरुणींच्या गर्दीने फुलू लागतात. पोलिस दरबारी तक्रारी करूनही पालथ्या घड्यावर पाणीच असल्याचे गावातील अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हॉटेलमध्ये धांगडधिंगा असतोच पण हॉटेल बंद झाल्यावरसुद्धा मद्यधुंद तरुण-तरुणी रस्त्यावर राडा करतात.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news