राजगुरुनगरची नवी पाणी योजना 31 जुलैपर्यंत कार्यान्वित

राजगुरुनगरची नवी पाणी योजना 31 जुलैपर्यंत कार्यान्वित

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा :  राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणारी नवी योजना 31 जुलैपर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती भाजपचे नेते तथा जिल्हा परिषद माजी सदस्य अतुल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजगुरुनगर शहराला चासकमान धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना गेली काही वर्षांपासून रखडली होती. धरणातून पाणी उपसा करण्यासाठी विजेची कमतरता होती. त्यासाठी एक्स्प्रेस फिडर आवश्यक होता. मात्र, एक्स्प्रेस फिडरचे काम रखडले होते. गेली काही वर्षे केवळ आश्वासने दिली जात होती. ही योजना आता 95 टक्के पूर्ण झाली आहे. याबाबत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

भाजप जिल्हा उपाध्यक्ष गणेश सांडभोर, नगरसेवक मनोहर सांडभोर, राहुल आढारी, अमर बोराडे, शहराध्यक्ष बाळासाहेब कहाणे आदी या वेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही पाणी योजनेसाठी पाठपुरावा केला. एक्स्प्रेस फिडरसाठी प्रयत्न केले. त्याचे काम जलदगतीने सुरू झाले आहे. हे काम पूर्ण होताच राजगुरुनगर शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळणार आहे. देशमुख म्हणाले, वीज, पाणी, आरोग्य, कचरा हे प्रश्न सोडविल्यास विकास होतो. त्यासाठी लोकप्रतिनिधींची मानसिकता आवश्यक आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शहरातील पाणी आणि गटार योजनेकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. आघाडी सरकार असताना हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. त्यांनी आता या योजनांचे श्रेय घेऊ नये.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्याने एक्स्प्रेस फिडरचे काम मार्गी लागले. आम्ही श्रेय घेण्यासाठी नाही तर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत आहोत. शहरातील गटार योजनेतील अडचणी दूर करून ती मार्गी लावू. अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण केले जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news