राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवर बंदी; शालेय शिक्षण विभागाचा जीआर | पुढारी

राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवर बंदी; शालेय शिक्षण विभागाचा जीआर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात शिक्षकांची तीस हजार पदे भरण्याचा निर्णय घेणार्‍या राज्य सरकारने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवर मात्र बंदी आणली आहे. यापुढे शिक्षकांना आंतरजिल्हा बदली घेता येणार नाही. नवीन भरतीतील शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदली बंदी लागू करताना जुन्या शिक्षकांना बदली जिल्हा निवडण्याची एकमेव आणि शेवटची संधी दिली जाणार आहे. शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवीच असल्यास नोकरीचा राजीनामा देऊन भरती निघणार्‍या जिल्ह्यात नोकरीसाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदली बंदीबाबतचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी जारी केला. एखाद्या जिल्ह्यात शिक्षक भरती निघाल्यानंतर इतर जिल्ह्यातील उमेदवार, शिक्षक तिथे अर्ज करून नोकरी पटकवतात. मात्र, एकदा नोकरी मिळाली की आपल्याला हव्या त्या जिल्ह्यात बदली करून घेतली जाते. परिणामी जिल्हा परिषदांच्या शाळांत मोठ्या प्रमाणावर पदे तशीच रिक्त राहतात. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आंतरजिल्हा बदली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागालाही आपल्या धोरणात या अनुषंगाने बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हांतर्गत आपसी बदली, वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत अपवादात्मक प्रकरणांतील बदलीबाबत ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जुन्या शिक्षकांपैकी बदली इच्छुक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची एक संधी दिली जाईल. तर, ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची 2022 मधील कार्यवाही पूर्ण झाली आहे मात्र विनंती बदली मिळालेली नाही अशा शिक्षकांची प्रतीक्षायादी तयार करून पदे रिक्त होतील त्याप्रमाणे नियुक्ती दिली जाणार आहे.

आचारसंहिता मोडणार्‍या शिक्षकांचे 50 टक्क्के वेतनकपात

शाळेत अथवा शाळेच्या परिसरात दारू, तंबाखुजन्य पदार्थ बाळगल्यास किंवा सेवन केल्यास कठोर कारवाई होणार आहे. तसेच, शिक्षकांनी त्यांच्यासाठीच्या आचारसंहितेचा भंग केल्यास प्रथम वर्तणुकीत सुधारणा करण्याची नोटीस दिली जाईल. त्यात सुधारणा न झाल्यास सहा महिन्यांसाठी जिल्हा प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास सहा महिन्यांसाठी 50 टक्के वेतनकपात करून पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. त्यानंतरही न झाल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.

Back to top button