

पुणे: कोणी महाकाल २.० हा नवीन ताल बसवला आहे, तर कोणी अग्निपथ, ट्रेन, गरबा, शिवराज, रामलखन, धुरंधर असे ताल सादर करणार आहेत. श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांकडून नवीन तालांचा निनाद ऐकायला मिळणार असून, पथकांमधील वादकांनी नवीन तालांची जोरदार तयारी केली आहे.
अनेक मंडळांनी मिरवणुकीत पथकांच्या वादनाला प्राधान्य दिले आहे. नेहमीच्या तालांपेक्षा वेगळे ताल पथकांनी बसवले आहेत आणि यावर थिरकण्याचा आनंद तरुणाईला घेता येणार आहे.
गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्येही पारंपरिक तालांसह नवीन ताल वाजवले जातात. विसर्जन मिरवणुकीसाठीही पथकांनी तालांची जोरदार तयारी केली असून, पथकांच्या पारंपरिक पेहरावात वादक, वादन करणार आहेत. पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार ढोल आणि ताशांची संख्या ठेवण्यात येणार असल्याचे पथकांमधील वादकांनी सांगितले.
शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाचे अध्यक्ष आशुतोष देशपांडे म्हणाले, आम्ही यंदाही नवीन ताल बसवले आहेत. या वेळी महाकाल २.० हा नवीन ताल सादर करणार आहोत, तर केरळी वाद्य चेंदा मेलम आणि ढोल-ताशा यांचे फ्युजन असलेला तालही पुणेकरांची नक्कीच मने जिंकणार आहे, तर संबळ आणि ढोल-ताशा एकत्रित वादनही ऐकायला मिळेल.
शिवअवतार ढोल-ताशा पथकाचे (वानवडी) ढोलवादक धवल दहिदुले म्हणाले, यंदा 'महाकाल', 'शिवराज', 'रामलखन' यांसह विविध तालांची जादू अनुभवायला मिळणार आहे. गणरायासमोर ढोलावर पहिली थाप पडताच वादकांमध्ये वेगळीच ऊर्जा संचारते. पारंपरिक तालांचा बाज जपत काही वेगळ्या रचनाही सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रुद्रगर्जना वाद्यपथकाचे अध्यक्ष आणि ताशावादक राहुल नायर म्हणाले, 'श्री जगन्नाथ' ही यंदाची आमची विशेष संकल्पना असून, १६ फूट उंच भव्य रचना पथकातील वादकांनी स्वतः साकारली आहे. पारंपरिक वादनाचा बाज कायम ठेवत 'धुरंधर'सह काही तालांची मेजवानी पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा आमचे पथक वादन करणार असून, त्यासाठी सर्व वादकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. भजनी, पाचवा हात, गजर आणि गावठी अशा विविध तालांचा निनाद मिरवणुकीत ऐकायला मिळणार आहे. प्रत्येक वर्षी बाप्पासमोर वादन करताना उत्साह पहिल्या वर्षासारखाच असतो.
- तेजवंती कपले, ढोलवादक, युवा वाद्यपथक ट्रस्ट.
अनुभवाच्या साथीला... नावीन्याची जोड या पथकाच्या टॅगलाइनप्रमाणे यंदाच्या वर्षी काही नवीन-जुने ताल मिरवणुकीत सादर करणार आहेत. त्यामध्ये पाऊण ताल, भजनी ताल, ३ गावठी ताल, करमोळी ताल, कच्छी ताल, असे जुने ताल नवीन पद्धतीने वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहोत, तर यंदाच्या वर्षी 'अभेद्य ताल' हा नवीन ताल सादर करणार आहेत.
- रोहन जोशी, अभेद्य वाद्यपथक