

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), खडकवासला येथे सुरू असलेल्या जलतरण प्रशिक्षणादरम्यान पहिल्या सत्रातील विद्यार्थी छात्र आदित्य डी. यादव (वय १८) याचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजता सराव सत्रादरम्यान घडला.
संरक्षण विभागाच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी जलतरणपटूंकरिता सराव सत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सर्व विद्यार्थी जलतरण तलावात पोहत होते. त्यावेळी आदित्य अचानक पाण्यावर हालचाल न करता तरंगताना दिसला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच दोन लाइफगार्ड्सने तत्काळ पाण्यात उडी घेतली आणि त्याला बाहेर काढले.
घटनास्थळीच आदित्य याला सीपीआर (हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन) तसेच प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले. त्यानंतर त्याला मिलिटरी हॉस्पिटल, खडकवासला येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही डॉक्टरांना आदित्यला वाचवता आले नाही. या घटनेने एनडीए परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एनडीए प्रशासनाने या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत, आदित्य यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना तसेच नजीकच्या नातेवाइकांना देण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी औपचारिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.